रत्नागिरी, दि. २२- अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा ‘राम मंदिर ते ग्राम मंदिर’ जिल्ह्यात होत आहे. आजचा दिवस घरोघरी दिवाळी उत्सवाचा दिवस आहे. मंदिर होणं ही आपली अस्मिता होती. ते पूर्ण करणारे नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद मोदीजी यांचा अभिमान आहे, असे सांगतानाच जिल्ह्यामध्ये सुरु होणाऱ्या ‘डिप क्लिनिंग’ मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील जयेश मंगल पार्कमध्ये श्री राम मंदिर ट्रस्ट आणि नगरपरिषदेच्यावतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आले होते. याठिकाणी पालकमंत्री श्री. सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्याधिकारी तुषार बाबर, वकील राजशेखर मलुष्टे आदींसह श्री राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला पालकमंत्री श्री. सामंत यांनी श्री राम प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
‘जय श्री राम, जय सियाराम’ च्या जयघोषणा देत, टाळ्या वाजवून आणि फटाके वाजवून या सोहळ्याचा उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला. प्रसाद म्हणून लाडू तसेच खिचडीचेही वाटप करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आजचा दिवस घरोघरी दिवाळीच्या उत्सवासारखा आहे. जिल्ह्यातील 4663 ग्राम मंदिर आणि 196 राम मंदिरात हा सोहळा होत आहे. रत्नागिरीचा हा पॅटर्न महाराष्ट्राचा झाला आणि तो देशात गेला. शालेय जीवनापासून दर 5 वर्षांनी राम मंदिरचा मुद्दा चर्चेत यायचा. राम मंदिर होणं, ही आपल्या सर्वांची अस्मिता होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ती पूर्ण केली. त्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे.
जिल्ह्यातील 2 हजार मंदिरांची स्वच्छता 2 दिवसात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली ‘डिप क्लिनिंग’ ही स्वच्छता मोहीम रविवारपासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्हावासियांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी उपस्थिती होती. अभिजित केळकर यांनी यावेळी सूत्रसंचलन केले.