जयपूर- जयपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे १७ हजार फूट उंचीवर असताना अचानक इंजिन फेल झालं. मात्र पायलटने सतर्कता दाखवत विमानाचे जयपूर विमानतळावर इमर्जन्सी सुरक्षित लँडिंग केले आणि १६० प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
इंजिन फेल झाल्याचं कळताच विमानातील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, पायलटने सतर्कता दाखवत विमानाचे इमर्जन्सी सुरक्षित लँडिंग केले. मृत्यूच्या दाढेतून परतताच विमानातील १६० प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. अंगावर काटा आणणारा हा थरार जयपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुखरुप आहेत. विशेष बाब म्हणजे, याआधीही इंडिगो विमानासोबत अशी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीच्या विमानाने सोमवारी सायंकाळी जयपूरहून कोलकात्याला जाण्यासाठी उड्डाण भरले. या विमानातून १६० प्रवासी प्रवास करीत होते. विमान १७ हजार फूट उंचीवर असताना अचानक पक्षी आदळल्याने इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच पालयटने प्रवाशांना सतर्क केले. दरम्यान, वैमानिकाने हवाई वाहतूक सेवेशी तत्काळ संपर्क साधला आणि विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करत जयपूर विमानतळावर परत आणले. विमानतळावर आपत्कालीन लँडिंग होताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.