
गणपतीपुळे, प्रतिनिधी- रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेची ग्रामदेवता श्री चंडिका मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली असून नऊ दिवसांत विविध धार्मिक; मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्राच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रामदेवता श्री चंडिका मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाचा गावचे खोत विजय राजाराम भिडे यांच्या हस्ते घटस्थापना करून शुभारंभ करण्यात आला.
गणपतीपुळे गावामध्ये जसे एक गाव एक गणपती अशी प्रथा चालू असून तसेच गणपतीपुळे श्री चंडिका मंदिरामधे ‘एक गाव एक नवरात्र उत्सव’ ही प्रथा ३७ वर्षापासून चालू आहे यामध्ये मंदिरामध्ये दुर्गा देवीची पार्थिव मूर्ती न आणता मंदिरामध्ये घटस्थापना करून हा उत्सव साजरा केला जातो
यावेळी संपूर्ण गाव उपस्थित असतो. सकाळी आठ ते नऊ देवीची पूजा; पोथी पठण तसेच दिवसभर ग्रामदेवतेचे दर्शन चालू असते
सायंकाळी ७वा गणपतीपुळे येथील वेगवेगळे यजमान आरतीसाठी उभे राहतात.आरतीला सुमारे सातशे ते आठशे लोक हजर असतात.
गणपतीपुळे परिसरात एकच उत्सव होत असल्याने गावातील दांडिया प्रेमी मोठ्या प्रमाणात दांडिया खेळण्यासाठी हजर असतात रात्री नऊ वाजल्यापासून दांडिया चालू असतो त्यानंतर विविध करमणुकीचे कार्यक्रम पार पडतात एकंदरीतच हा नवरात्र उत्सव गुण्यागोविंदाने येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात.