रत्नागिरी: मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत यशदा, पुणे मार्फत सरपंच आणि ग्रामसेवक यांचे करिता ग्राम स्व-निधी करिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये २० सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायत ने आपले स्वतःचे उत्पन्न आणि उत्पन्नाचे स्तोत्र कसे विकसित करावे, याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला यशदा पुणे येथील सत्र संचालक अमोल बेमिस्टे यांनी भेट देऊन सरपंच आणि ग्रामसेवक यांना स्व-निधी बद्दल विस्तृत अशी माहिती दिली. तसेच मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे; मत्स्य संपत्ती, अर्थ, सांख्यिकी व विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नितीन सावंत; मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी सहभागी सरपंच आणि ग्रामसेवकांना डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ आणि मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरीची शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच सर्वांना विद्यापीठाने प्रकाशित केलेलं वार्तापत्र व शाश्वत मासेमारी याबद्दल माहिती देणारी पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथील राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या प्रशिक्षणगृहामध्ये करण्यात आले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून श्री कुलकर्णी यांनी काम बघितले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे तसेच महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.