रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध गेल्या २ वर्षांपासून सुरु आहे. अजूनही दोन्ही देशांमधील युद्ध थांबलेले नाही. दोन्ही देशांमधील शेकडो लोकं आतापर्यंत ठार झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांच्या प्रमुखांना चर्चेने मार्ग काढण्याचा सल्ला दिला आहे.दरम्यान मोदींनी पुन्हा एकदा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केली आहे.
रशिया-युक्रेन युद्ध कधी संपणार, पंतप्रधान मोदींचा युक्रेनच्या अध्यक्षांना फोन…
नवी दिल्ली- रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही सुरुच आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली आहे. त्यांनी रशिया-युक्रेन संघर्ष लवकर संपवण्यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. भारत युक्रेनला मानवतावादी मदत देत राहील, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना सांगितले आहे.
पीएम मोदींनी ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारत-युक्रेन भागीदारी मजबूत करण्यावर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा झाली. सर्व शांतता प्रयत्नांना भारताचा सतत पाठिंबा आहे. तसेच चालू संघर्ष लवकर संपवण्यासाठी संदेश दिलाय. भारत त्याच्या लोककेंद्रित दृष्टिकोनानुसार मानवतावादी सहाय्य प्रदान करत राहील.”
युद्ध थांबवण्याचे आवाहन…
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध शांत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी त्यांनी फोनवरुन चर्चा केली आहे. मोदींनी याआधी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीही फोनवर चर्चा केलीये. रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हा एकमेव मार्ग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
रशिया-युक्रेन संघर्षावर चर्चा करताना, मोदींनी पुढे जाण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा समर्थक म्हणून भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे. रशियाचे बलाढ्य नेते पुतिन यांनी नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवलाय. त्यांनी पाचव्यांदा ही निवडणूक जिंकली आहे.
दोन वर्षापासून सुरुये युद्ध..
डिसेंबर 1999 पासून पुतिन हे रशियाचे नेतृत्व करत आहेत. 20 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण अजून ही दोन्ही देशांमध्ये शांतता करार झालेला नाही. दोन्ही बाजूंनी आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले आहेत. युद्ध संपवण्यासाठी भारत सातत्याने प्रयत्न करत आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक नेते म्हटले आहे. याशिवाय देशासाठी काम करणारे ते नेते असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. भारत-रशिय़ा संबंधावर त्यांनी याआधी अनेकदा वक्तव्य केले आहे. भारताचे दोन्ही देशांसोबत चांगले संबंध आहेत.