केंद्रीय राज्यमंत्र्यांचे भाजपा आमदारांविरोधात उघड बंड; काय आहे नेमकं प्रकरण?..

Spread the love

भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मोजक्या भाजपा पदाधिकाऱ्यांशी (पाटील समर्थक) संवाद साधावा म्हणून केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) शुक्रवारी मुरबाडचे शिंदे गटाचे नेते सुभाष पवार यांच्या कार्यालयात आले होते. त्या बैठकीत त्यांनी आपल्या मोजक्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि मतदान आणि पुढची व्यूहनिती याविषयी चर्चा केली.

ठाणे : ज्या माणसानं आपल्या विरोधात उघडपणं काम केलं. तुतारी आणि इतरांची मतदान केंद्र परिसरात टेबल लावण्यासाठी साहाय्य केलं. त्या माणसाचा आपल्या विजय आणि मताधिक्यात काय संबंध असेल. आपण यामध्ये कोणाचेही नाव घेत नाही. त्यांचं नाव घेऊन आपण त्यांना नाहक मोठे पण करू इच्छित नाही. असं बोलून कपिल पाटील (Kapil Patil) यांनी किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुरबाड मतदारसंघात काम केलं नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र पाटील यांच्या या विधानावरून येत्या काळात पाटील, कथोरे वाद टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील दोघात राजकीय लढाई सुरु…

भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्यात गेल्या काही वर्षापासून भाजपामध्ये वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी राजकीय लढाई सुरु असल्यानं जिल्हाच्या भाजपामध्ये दोन गट पडल्याचं दिसून येतय. विशेष म्हणजे दोघेही भाजपा लोकप्रतिनिधी असूनही एकमेकांच्या कार्यक्रमात दांडी मारत असल्याचं अनेकदा उघडकीस आलं. त्यातच एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करण्यात दोघेही माहीर असल्याचं दिसून येत असतानाच, पुन्हा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आमदार कथोरे यांचे नाव न घेता संताप व्यक्त केलाय.

पुन्हा कथोरे-पाटील वाद…

विशेष म्हणजे मागील दोन वर्षापासून कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ तसेच जिल्हा भाजपा कार्यकारिणीतून कथोरे समर्थकांना डावलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं नाराज झालेल्या कथोरे समर्थकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा वाद सुरू असताना पाटील यांच्याकडून कथोरे हे कुणबी समाजातील असल्यानं आगरी, कुणबी वाद पेटवला. जागोजागी कथोरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. कथोरे यांनीही शांत राहून प्रदेश नेत्यांना सुरू असलेल्या घटनांची माहिती देऊन भाजपाचे कार्य सुरू ठेवले. त्यामुळं येत्या काळात मागील दोन महिन्यांपासून शमलेला कथोरे-पाटील वाद पुन्हा जोरदार पेटण्याची चिन्हे आहेत.

कथोरे यांनी पाटील यांच्या प्रचाराचं काम केलं…

दरम्यानच्या काळात कथोरे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळं पाटील यांचा राग अनावर झाला. तेव्हापासून ते कथोरे यांना जागोजागी पाण्यात पाहू लागले. पाटील, कथोरे वाद भाजपाच्या मुळावर येईल म्हणून भाजपा नेत्यांनी यात दिलजमाई करून हा विषय मिटवला. पण अंतर्गत धग कायम होती. लोकसभा निवडणूकीच्यावेळी कथोरे यांनी कपिल पाटील यांच्या प्रचाराचे काम केले. कार्यकर्त्यांनी कथोरे यांना पाटील यांनी दिलेल्या त्रासाची माहिती असल्यानं त्यांनी निवडणुकीत त्याचे उट्टे काढण्याची भाषा केली होती. कथोरे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना शांत करून समजावून पंतप्रधान यांच्यासाठी कपिल पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं निवडणूक आणण्याचे आणि मुरबाड मतदारसंघातून अधिकचे मताधिक्य देण्याचं आवाहन केलं होतं. कथोरे पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाले तरी त्यावर पाटील समाधानी नसल्याचं आता स्पष्ट झालंय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page