मतदानानंतर ईव्हीएम मशिन नेणाऱ्या कारवर जमावाचा हल्ला, नेमका काय घडला प्रकार?…

Spread the love

मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात बुधवारी रात्री निवडणूक आयोगाच्या कारवर हल्ला झाल्यानं मोठा गोंधळ झाला. जमावानं गैरसमजामधून निवडणूक आयोगाच्या कारवर हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नागपूर- मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात झोनल अधिकारी मतदान केंद्रातून नियमबाह्य पद्धतीने ईव्हीएम दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहे, असा काही जणांना संशय आला. या संशयातून जमावानं निवडणूक कामासाठी लावण्यात आलेल्या दोन तवेरा कारवर हल्ला करत वाहनांची जबर तोडफोड केली आहे. या जमावामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा भाजपाकडून आरोप करण्यात आला आहे.

मध्य नागपुरमधील किल्ला परिसरात संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राडा झाला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किल्ला परिसरातील एका मतदान केंद्राच्या आवारातून एक तवेरा गाडी बाहेर पडली. त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील झोनल अधिकारी काही ईव्हीएम घेऊन जात असतानाचं जमावाला दिसले. मतदान केंद्रातून ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यासाठी प्रक्रिया असते. मात्र, या प्रक्रियेचं उल्लंघन होत असल्याचा जमावाला संशय आला. या संशयातून काही लोकांनी तवेरा कारचा पाठलाग केला. काही अंतरावर ती तवेरा थांबवून जमावानं जबर तोडफोड केली.

पोलिसांनी केली मध्यस्थी-*l

तवेराची तोडफोड झाल्यानंतर इतर निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी तवेरा घटनास्थळी पोहोचली. जमावातील काही लोकांनी त्या वाहनावरही दगडफेक केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही दक्ष नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाद संपुष्टात येण्याऐवजी गैरसमज होत वाद वाढत गेला. सूचना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत जमावाच्या तावडीतून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटका केली.

भाजपा-काँग्रेस कार्यकर्ते संतप्त-

या गोंधळानंतर मोठ्या संख्येनं भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते कोतवाली पोलीस स्टेशनच्या समोर जमा झाले. त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तवेरा कारवर नाही तर त्यातील ईव्हीएमवर ( अतिरिक्त ईव्हीएमस ) हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला. नागपूरचे सह पोलीस आयुक्त निसार तांबोळी म्हणाले, मतदानानंतर अधिकारी झेरॉक्स सेंटर गेले होते. मात्र, ते ईव्हीएम मशिन घेऊन गेले आहेत, असा गैरसमज पसरला. त्यांच्याकडे अतिरिक्त ईव्हीएम मशिन होते. अधिकाऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न झाल्यानंतर बाचाबाची झाली. अधिकारी आणि मूळ ईव्हीएम मशिन सुरक्षित आहेत. दोन्ही बाजुच्या जमावांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. अतिरिक्त ईव्हीएम मशिनदेखील सुरक्षित आहेत. तक्रारीनंतर कायदेशीर कारवाई करणार आहोत.”

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page