मुंबई- लोकसभा निवडणुकीतील एक्झिट पोलचा भंपकपणा मतमोजणीत समोर आला आणि संपूर्ण देशातच इंडिया आघाडीने अभूतपूर्व यश मिळविले. स्वातंत्र्यानंतर देशातील संविधानाच्या प्रश्नावर झालेली ही निवडणूक एक अभूतपूर्व अशीच मानावी लागेल. या निवडणुकीत रत्नागिरी लोकसभा मतदासंघातील नारायण राणे (भाजप) यांनी खेचून आणलेला विजय हा कोणत्याही एक्झिट पोलला अपेक्षित नव्हताच. महाराष्ट्रात महाविकास (इंडिया) आघाडीची तुफान लाट असताना राणे यांनी त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, राजकीय मुत्सद्दीपणा आणि त्यांची स्वतंत्र असणारी रणनिती या जोरावरच हा विजय खेचून आणला. वास्तवात या मतदारसंघातून तब्येतीच्या कारणाने आपण निवडणूक लढविण्यास इच्छूक नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले होते; मात्र भाजपचे ना. अमित शहा यांचे मत होते यावेळी कोकण हा भाजपच आणि कमळ हे चिन्हच लढेल. त्यांनी तसा निर्णय घेऊनही टाकला होता. त्यामुळेच शिंदे शिवसेना गटाचे किरण सामंत यांना अखेरच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आले. हा क्षण शिवसेनेचे विनायक राऊत यांना त्यांचा विजय नक्कीच झाला असाच वाटणारा होता; मात्र नारायण राणे यांनी आपल्या राजकीय मुत्सद्दीपणा आणि साम, दाम, दंड, निती राजकारणात जिंकणे हेच मुख्य ध्येय हे तंत्र वापरत जी विजश्री खेचून आणली ती विशेष आहे.
संभाव्य घटनांचा आणि परिस्थितीचा विचार नारायण राणे यांनी पूर्वीच केलेला असावा, कारण ही निवडणूक त्यांच्या गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीच्या अस्तित्वाची ठरणारी होती. त्यामुळे सर्वस्व पणाला लावूनच त्यांत ते उतरले होते.
या मतदारसंघाचे सिंधुदुर्गतील ३ विधानसभा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील ३ विधानसभा असे दोन भाग पडले होते. यातील सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली हा नीतेश राणे यांच्या विधानसभा मतदारसंघाव्यतिरिक्त राणे यांना मताधिक्य मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त होत होता. सावंतवाडी-दोडामार्ग हा दीपक केसरकर यांचा मतदारसंघ त्यांचे राणे यांचे संबध विचारात घेता ते फारसा प्रतिसाद देणार नाहीत. त्यामुळे येथे विनायक राऊत यांनाच लीड मिळेल, तर मालवण, कुडाळ हा तर शिवसेनेचे निष्ठावंत तरुण आमदार वैभव नाईक यांचा मतदारसंघ. येथे उद्धव ठाकरे यांची सभा ही अत्यंत जोरदार झालेली त्यामुळे येथे विनायक राऊत यांना मोठे लीड मिळेल ही अपेक्षा होती. ह्या साऱ्यांची गोळाबेरीज राणे सिंधुदुर्गात समसमान होतील, कदाचित १०-२० हजारांनी मागे जातील, अधिक राजापूरमध्ये विनायक राऊत यांना लीड मिळणार ते लीड रत्नागिरी आणि चिपळूण मतदारसंघ तोडणार असा त्यांचा कयास होता; मात्र या सगळ्या गणिताला राणेनितीने फाटा देत त्यांनी वेगळीच रणनिती खेळली आणि त्यात त्यांना यश मिळाले हे आजच्या वातावणात फारच महत्त्वाचे आणि केंद्रीय पातळीवर त्यांचे महत्त्व विशेष वाढविणारे ठरणार आहे.
कणकवली विधानसभा मतदासंघात राणे यांना ४१ हजार ९९५ मतांचे मताधिक्य मिळाले हा एकतर्फीच मते खेचल्याचा प्रकार म्हणता येईल. राणे यांना ९२ हजार ४१९ आणि राऊत ५० हजार ४२४ मते मिळाली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने राणे यांना ३१ हजार ७१९ मतांचे मताधिक्य दिले. मालवण हा वैभव नाईक (उबाठा) शिवसेनेचा बालेकिल्ला; मात्र येथे राणेंच्या धनशक्तीने चमत्कार केला आणि ९७ हजार ५१३ मते घेत २६ हजार २३६ चे मताधिक्य घेतले हे फारच आश्चर्य कारक मानल जात आहे. राणे यांनी त्यांचे सर्वाधिक लक्ष हे त्यांचे होमटाऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यावर केंद्रित केले. या तीन विधानसभा मतदारसंघातून त्यांनी ९९ हजार ९६० चे मताधिक्य मिळावले हेच त्यांच्या विशेष रणनितीचे यश होते.
रत्नागिरी येथील सामंत बंधूंमधील कलहाचा फटका आपणाला बसू शकतो याचा अंदाज त्यांना पूर्वीच आला होता. अमित शहा यांच्या रत्नागिरी येथील सभेच्या माध्यमातून त्यांनी तो काही प्रमाणात पॅचअप करण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही रत्नागिरी जिल्ह्याकडून त्यांनी मताधिक्याची अपेक्षा सोडून दिली होता आणि आपल्या विजयाची तरतूद सिंधुदुर्ग जिल्ह्यातच केली होती.
यातील आणखी एक महत्त्वपूर्ण उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेचे येथील आमदार राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या अभूतपूर्वलाटेचा फायदा आपल्या मतदारसंघात करू शकले नाही. विनायक राऊत यांच्या दोन टर्ममधील विशेष कामांचा प्रभावही कोठे दिसला नाही. गावांगावात जाणे आणि प्रत्येकाला भेटत संपर्क ठेवणे हे विनायक राऊत यांचे शक्तिस्थान होते; मात्र यावेळी त्याचा परिणाम मतात रूपांतरित होताना दिसला नाही. कुडाळ हा वैभव नाईक यांचा मतदारसंघ असताना तेथे विनायक राऊत मताधिक्य घेऊ शकले नाहीत येथेच त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला.
या लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून राजापूर विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. येथील विद्यमान आमदार राजन साळवी यांचा प्रभाव अधिक मागील विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांना ५० हजार मते मिळाली होती.
यावेळी ही दोन्ही मते एकत्र गृहीत धरली जात होती त्यामुळे राजापूर किमान ४० ते ५० हजारांचे मताधिक्य गृहीत धरले जात होते. राजापूर लोकसभा हा या निवडणुकीतील कळीचा मुद्दा होता. या निवडणुकीच्या निर्णयात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहणार होता. कोकणातील तालुका, गाव पातळीवरील राजकीय नेत्यांना आर्थिक पातळीवर कसे मॅनेज करावे आणि मतदानाच्या आदल्यारात्री मतांचा गठ्ठा आपल्याकडे कसा फिरवावा या यंत्रणेत राणे आणि त्यांची टीम जबरदस्त माहिर आहे. राजापुरात त्याचा मोठा परिणाम साधण्यात त्यांना यश आले त्यामुळेच जो विधानसभा ४०-५० हजारांचे मताधिक्य देणार होता तो फक्त २० हजारांवर स्तिमीत झाला.
रत्नागिरी येथील आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार काम केले होते. प्रसंगी बंधुप्रेमाला दूर सारत त्यांनी अमित शहा यांना दिलेला शब्द पाळत जोरदार प्रचार यंत्रणा राबविली होती आणि त्यांना मिळालेल्या विधानसभेतील मताधिक्याप्रमाणेच यावेळी रिझल्ट असेल, असे आश्वस्थ केले होते; मात्र प्रत्यक्षात मतदारांनी पाठ फिरविली आणि रत्नागिरी विधानसभेने ९ हजार ६७८ चे मताधिक्य विनायक राऊत यांना दिले. तोच प्रभाव चिपळूण मतदारसंघात झाला. येथील आमदार शेखर निकम तर स्वतः प्रत्येक घराघरात फिरत होते. सर्वत्र खाऊ वाटप करत होते; मात्र तेथे त्यांना अनेक ठिकाणी मतदारांनी नाकारले. या मतदारसंघात विनायक राऊत यांना २० हजार ६३१ चे मताधिक्य मिळाले.
ही एक प्रकारे विधानसभेपूर्वीची चाचणी आहे. राणे यांचा विजय होताना सामंत आणि निकम यांना मात्र मतांच्या आकडेवारीत पराभूत व्हावे लागले आणि कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला उद्धव ठाकरे यांच्या हातातून राणे यांच्याकडे गेल्याचे चित्र समोर आले आहे. राणे यांना पुढील विधानसभा निवडणुकीत आपल्या साऱ्याच प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पुन्हा कोकणचा अनभिषीक्त सम्राट होण्याची ही नवी सुरवात सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.