नवी मुंबई; प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जन सामान्यांचं प्रबोधन केलं.
शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदयाची परंपरा
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे.
बाबा महाराजांचा जीवन परिचय
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा जोपासली जातेय. बाबा महाराजांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून बाबा महाराज सातारकरांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचं शिक्षण घेतलं. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. तिथूनच त्यांवर कीर्तनाचे संस्कार रुजत गेले. वयाच्या अकराव्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले आहेत.