भाईंदर : मीरा रोडमध्ये मिरवणूकीवर दगडफेक, वाहनांची तोडफोड

Spread the love

राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळनिमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री मीरारोड परिसरात घडली आहे.

भाईंदर : राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळनिमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री मीरारोड परिसरात घडली आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत ४ तरूण जखमी तर २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आयोध्येत आज राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या पार्श्वभूमीवर मीरारोड आणि भाईंदर शहरात मिरवणुका काढल्या जात आहेत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक मिरवणूक मीरारोडच्या हैदरी चौकातून जात असताना जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यात हल्लेखोरांनी मिरवणूकीत सहभागी झालेल्या लोकांना मारहाण करून वाहनाची तोडफोड केली. यामध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून जवळपास वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मध्यरात्री नया नगर पोलीस ठाण्यात दंगल करणे, समाजात तेढ निर्माण करणे तसेच हत्येचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून शांततेचे आवाहन…

रविवारी झालेल्या वादाचे पडसाद हे मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर दिसून येऊ लागले आहेत. रविवारी मध्यरात्री अनेक तरुण भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. त्यामुळे शहरातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान रविवारी किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद होऊन तो आता निवळला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वातावरण शांत ठेवावे, असे आवाहन नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page