केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचे केले उद्घाटन…
रत्नागिरी : प्रतिनिधी : कोकणासह रत्नागिरीमध्ये उद्योग व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधी शोधून कष्ट करण्याची आवश्यकता आहे. इथल्या तरुण वर्गाने अंबानी अदानी यांच्यासारखे उद्योग उभारण्याची महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे. समोर यशाचा डोंगर उभा असेल, तो चढण्यासाठी कष्ट नक्की होतील पण तो सर करून यशस्वी होण्याची जिद्द ठेवा असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरीत केले. तर रत्नागिरीमध्ये क्लस्टर प्रपोजल करा, रत्नागिरीसाठी ट्रेनिंग सेंटर देतो, अशा घोषणा करतानाच पुढकार घ्या, आवश्यक ते सर्व सहकार्य आपण देण्यास तयार आहोत असे आश्वासन देत उद्योगाच्या मध्यानातून स्वावलंबी बना असे आवाहन केले.
केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन ना. राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खा. निलेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, माजी आ. डॉ. विनय नातू, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, खादी ग्रामद्योग आयोगाचे सीईओ विनीत कुमार, एमएसएमईच्या डि.आय.जी. अनुजा बापट, एमएसएमई डीएफओ नागपूरचे संचालक पी. एम. पारलेवार, डिएफओचे सहसंचालक डॉ. व्ही. आर. शिरसाट, एमएसएमईचे सहसंचालक अमित तमारिया, सहसंचालक गौरव कटारिया, मनोज शर्मा, सहा. संचालक व्ही. व्ही. खरे, राहूल मिश्रा, क्वायरबोर्ड मुंबई विभागीय संचालक गीता भोईर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, पी.एम. विश्वकर्मा रत्नागिरीचे सदस्य अशोक मयेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक आणि रत्नागिरीकर उपस्थित होते. त्यांना संबोधताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, एमएसएमईचे मंत्रीपद आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक उद्योजक, तरुण दिल्लीमध्ये भेटण्यासाठी आले. परंतु कोकणातील दोन जिल्ह्यांमधील एकही उद्योजक किंवा तरुण उद्योग सुरु करण्यासाठी भेटायला आला नाही ही आपल्याला खंत आहे. अदानी, अंबानीं सारखे उद्योजक कोकणात तयार व्हायला हवेत अशी आपली ईच्छा असून जास्तीत युवा पिढीने उद्योग व्यवसाय सुरु करावेत. कोकणामध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. हा महोत्सव कोणत्याही राजकीय पक्षासाठी, जातीसाठी नसून रत्नागिरीकरांसाठी आहे. एमएसएमईच्या माध्यमातून येथील नागरिकांची प्रगती व्हावी येवढीच आपली भावना आहे. रत्नागिरीकरांचे दरडोई उत्पन्न एक लाख चौर्याऐंशी हजार रुपये, सिंधुदुर्गचेही त्याहून अधिक आहे. गोव्याचे सव्वाचार लाखाहून अधिक असून, गोव्यासारखेच निसर्ग सौंदर्य, नैसर्गिक साधनसंपत्ती रत्नागिरीत असूनही आर्थिक सुबत्ता दिसत नाही. खरंतर इथे अनेक संधी उपलब्ध आहेत, मात्र त्या संधी शोधून त्यातून यश मिळवण्यासाठी कष्टाची गरज आहे. एमएसएमई मंत्रालयाच्या अखत्यारीत जवळपास सात कोटी उद्योग असून 15 ते 16 कोटी कामगार आहेत. देशाच्या जीडीपीत 30 टक्के या मंत्रालयाचा वाटा असून निर्यात जवळपास 49 टक्के आहे. रत्नागिरीत लहान मोठ्या उद्योगांची संख्या जवळपास 62 हजार उद्योग आहे. हा आकडा वाढला पाहिजे, यासाठीच रत्नागिरीमध्ये क्लस्टर प्रपोजल करा, आवश्यक ते सर्व सहकार्य आपण देण्यास तयार आहोत. नवीन उद्योग सुरु करण्यासाठी रत्नागिरीत ट्रेनिंग सेंटर देतो, मात्र हे ट्रेनिंग सेंटर व्हावे यासाठीही कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे असेही ना. राणे यांनी सांगितले.
यावेळी आपल्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून अनेक दाखले ना. राणे यांनी उपस्थितांना दिले. त्यातून कसे व्यवसाय उभे केले जातात ते उदाहरणासह पटवून दिले. ते म्हणाले कोकणात अफाट बुध्दीमत्ता आहे. परंतु तिचा वापर उत्कर्षासाठी व्यवसायासाठी केला जात नाही. कमी अर्थार्जनामुळे येथील जनता आर्थिक अडचणीत असल्याचे सांगताना, शेतीव्यवसायावर येथील नागरिकांनी भर दिला पाहिजे. आंबा, काजू, फणस, जांभूळ, चहापाती यातून मोठे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. फणसाची बी आपण खातो तरी किंवा गुरांना टाकून देतो. परंतु त्या बीपासून बनवलेल्या पावडरसह अनेक पदार्थ तयार होतात, त्यामध्ये डायबेटीसला प्रतिरोध करतील अशी तत्व असतात. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करुन उद्योगधंदे वाढीसाठी प्रयत्न झाला पाहिजे, त्यासाठी आपले मंत्रालय सर्वातोपरी मदत करायला तयार असल्याचे ना. राणे यांनी सांगितले.
सध्या महिलांचा उद्योग व्यवसायात 20 टक्केच हिस्सा असून तो 40 टक्के झाला पाहिजे. महिलांसाठी विविध योजना मंत्रालयातर्फे राबवल्या जात असून, त्याचा फायदा घेऊन महिलांनी उद्योगिनी बनावे अशा भावना ना. राणे यांनी व्यक्त केल्या.
मी प्रगतीचा भोक्ता आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रगती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जास्त पैसा मिळवा, योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करा आणि व्यसने टाळा, व्यसनाने माणून अधोगतीकडे जात असल्याचे ना. राणे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवरायांची जयंती असून, महाराजांमधील गूण आत्मसात करायचे प्रयत्न करा, खरेतर महाराजांच्या गुणांची आज देशाला गरज आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी 54 योजना आणल्या आहेत. मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था 11व्या स्थानी होती, आता ती 5 व्या नंबरवर असून सन 2030मध्ये ती 3 र्या नंबरवर न्यायची असल्याचे स्वप्न त्यांनी पाहिले असून, आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे असे आवाहनही ना. राणे यांनी केले.
यावेळी खादी ग्रामद्योग आयोगाचे सीईओ विनीत कुमार यांनी एमएसएमईचे देशातील आणि कोकणातील योगदान याबद्दल विवेचन केले. तर एमएसएमईच्या डि.आय.जी. अनुजा बापट यांनी एमएसएमईमधील उपलब्ध संधींबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमएसएमई डीएफओ नागपूरचे संचालक पी. एम. पारलेवार यांनी केले.
याच कार्यक्रमात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात बँकेच्या कर्जाचे धनादेशाचे वाटप ना. राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्यमनगर सहकारी संस्थेचे चेअरमन मोहनराव इंदुलकर, सौ. इंदुलकर, रत्नागिरी सुवर्णकार संघटना, रत्नागिरी व्यापारी महासंघ, व्यापारी आघाडी भाजपा महाराष्ट्राचे भगवंतसिंह चुन्डावंत,भाजपा कामगार मोर्चाचे संतोष बोरकर, भाजपा रत्नागिरी यांनी केंद्रीय मंत्री राणे याचे स्वागत आणि या महोत्सवाबद्दल आभार व्यक्त केले. तर डिएफओचे सहसंचालक डॉ. व्ही. आर. शिरसाट यांनी आभार व्यक्त केले.