
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा 5 जानेवारीला लिलाव होणार आहे. दाऊद इब्राहिमची संपत्ती फॉरेन एक्स्चेंज अॅक्ट (फेमा) अंतर्गत जप्त करण्यात आली होती.
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात विषबाधा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र भारतीय तपास यंत्रणांनी दाऊद दर महिन्याला रुग्णालयात संपूर्ण बॉडी चेकअपसाठी जात असल्याची माहिती दिल्याने, ही अफवा असल्याचं कळतय. आता दाऊद संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. दाऊदच्या मुंबई पाठोपाठ रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव होणार आहे. हा लिलाव 5 जानेवारी 2024 ला होणार असल्याची माहिती सुरभी शर्मा यांनी नोटीस काढून माहिती दिलीय.
जमिनीचा लिलाव….
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या मुंबके येथील 4 शेत जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. शेतजमीन सर्वे नंबर 442 यासाठी रिझर्व किंमत नऊ लाख 41 हजार 280, शेतजमीन सर्वे नंबर 453 यासाठी रिझर्व किंमत आठ लाख 8 हजार 770, सर्वे नंबर 617 ही 170.98 स्क्वेअर मीटर 01.69 गुंठा असून त्याची रिझर्व किंमत 15 हजार 440 आहे. शेतजमीन सर्वे नंबर 842 ही 17.10 गुंठा जमिनीसाठी रिझर्व किंमत एक लाख 56 हजार 270 इतकी ठेवण्यात आली आहे. सर्वे नंबर 442 ही जमीन 10 हजात 420. 51 स्क्वेअर मीटर इतकी आहे, तर सर्वे नंबर 453 या जमिनीचे क्षेत्रफळ 8953.55 स्क्वेअर मीटर इतकं आहे.
बंगला आणि आंब्याच्या बागेचा लिलाव….
5 जानेवारी 2024 ला शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हा लिलाव ई ऑक्शन स्वरूपात होणार आहे. http.://education.auction.auctiontiger.net या वेबसाईटवरून ई ऑक्शन पद्धतीने ऑनलाइन स्वरूपात इच्छुक या लिलावात सामील होऊ शकतात. अधिक माहितीनुसार, दाऊदचा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबके येथील बंगला आणि आंब्याच्या बागेचा लिलाव होणार आहे. रत्नागिरीतील एकूण 4 मालमत्तांचा लिलाव होणार आहे. स्मगलर आणि फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर मार्फत (SAFEMA) दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल. ड्रग्ज प्रकरणात महसूल विभागानं दाऊदची संपत्ती जप्त केली होती. याआधीही सेफेमाने दाऊदच्या मुंबईतील संपत्तीचा लिलाव केला होता.
अगोदर झालेले दाऊदच्या मालमत्तेचे लिलाव…
दाऊदच्या 11 मालमत्तेचा पहिल्यांदा 2000 मध्ये आयकर विभागाने लिलाव केला होता. मात्र त्यावेळी लिलाव प्रक्रियेत कोणीही आले नव्हते. गेल्या काही वर्षांत दाऊदच्या अनेक मालमत्ता विकून त्याचा ताबा खरेदीदारांना मिळवून देण्यात तपास यंत्रणांना योग्य ते यश आलं होतं. 2018 मध्ये नागपाडा येथील एक हॉटेल, एक गेस्ट हाऊस आणि दाऊदची एक इमारत विकण्यात आली होती. त्याचवेळी दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या दक्षिण मुंबईतील फ्लॅटचा लिलाव करण्यात तपास यंत्रणेला यश आलंय.
रत्नागिरीतही मालमत्तेचा लिलाव….
दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाच्या 1.10 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा रत्नागिरीमध्ये लिलाव करण्यात आला. या लिलावात दोन भूखंड आणि एक बंद पेट्रोल पंप यांचा समावेश होता. दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या नावावर खेड तालुक्यातील लोटे गावात या मालमत्तांची नोंद करण्यात आली होती. हसीनाचे अनेक वर्षांपूर्वी निधन झालेले आहे.