तेलगाव पाटीजवळ भारधाव वाहनाची दुचाकीस धडक:एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी, हट्टा पोलिस घटनास्थळी दाखल…

Spread the love

हिंगोली- वसमत ते परभणी मार्गावर तेलगाव पाटीजवळ हिट ॲण्ड रनचा प्रकार घडला असून अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ता. २३ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातातील दोघेही परभणी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथून दोघे जण त्यांच्या दुचाकी वाहनावर परभणीकडे जात होते. त्यांचे दुचाकी वाहन तेलगाव पाटीजवळ आले असतांना भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडली तर दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या खाली जाऊन पडले. या अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार संदीप सुरुशे, सुर्यवंशी, महेश अवचार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर घटनास्थळावर पडलेल्या दोघांची तपासणी केली असता त्यापैकी एक जण ठार तर एक जण गंभीर झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गंभीर जखमी असलेल्या तरुणावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. घटनास्थळावर आढळून आलेल्या मोबाईलवरून पोलिसांनी काही क्रमांकाशी संपर्क साधला असता ते दोघेही परभणी येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांनाही अपघाताची माहिती दिली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

दरम्यान, सदरील दोघे जण परभणीकडे जात असतांना त्यांचे दुचाकी वाहन एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळल्याची चर्चा सुरु असून पोलिसांनी त्यादृष्टीने माहिती घेण्यास सुरवात केली आहे. अपघातातील मयतांची नांवे समजू शकली नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page