
चिपळूण :- काही दिवसांपूर्वी तीन बांगलादेशीना रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने खेर्डी येथून अटक केली होती. त्यापाठोपाठ डेरवण येथे आणखी दोन बांगलादेशी तरूण सापडले असून बुधवारी सकाळी सावर्डे पोलिसांनी त्यांना अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्ताक महमंद शेख (३९,) शाहिन वहिब गाझी (२६, दोघेही बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही दोन महिन्यांपासून डेरवण येथे वास्तव्याला होते. बिगारी कामगार म्हणून ते सावर्डे परिसरात काम करत आहेत. जिथे ते कामाला होते, तिथेच ते राहत होते. या दोघांविषयी सावर्डे पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड व अन्य सहकाऱ्यांनी तत्काळ डेरवण येथे जाऊन या दोघांना ताब्यात घेत अटक केली. या दोघांकडून काही कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे दोघेजण भारतात कधी व कोणत्या मार्गाने आले, ते किती वर्षे येथे वास्तव्य करित आहेत, त्यांच्या येण्याचा हेतू काय, आदी बाबींची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वीच खेर्डी मोहल्ला येथून तिघा बांगलादेशींना रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. बुल्लू हुसेन मुल्ला, जलानी बुल्लू मुल्ला, जॉनी बुल्लू मुल्ला अशी त्यांची नावे होती.
जाहिरात

जाहिरात


जाहिरात
