
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न…
रत्नागिरी : २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार होते. परंतु विरोधकांनी सहा महिने आधी फेक नरेटिव्ह सेट करायला सुरवात केली. अशी वेळ २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा येणार नाही, याकरिता फेक नरेटिव्हना कार्यकर्ताच घरोघरी जाऊन उत्तर देणार आहे. विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची गरज असते. तेवढे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते काय घ्यायचा तो निर्णय घेतील. पण आपण तयारी करूया. कोकणात भाजपाची ताकद लोकसभा व कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आली आहे, अशा सूचना भाजपा नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा बैठकीत दिले.
स्वयंवर मंगल कार्यालयात ही बैठक झाली. मंत्री चव्हाण म्हणाले की, कोकणात आता सणांचे दिवस सुरू होतील. परंतु सण साजरे करताना देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद मिळतील असे कार्यक्रम घ्या. प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण क्षमतेने काम करण्यास सुरवात करा. लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येणार नाही, असे जे बोलत होते तेच लोक आता भाजपची ताकद चांगलीच आहे, असे बोलू लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या
कार्यकर्तुत्वामुळेच महाराष्ट्रातील २८ हजार गावे जलयुक्त, मुंबईत मेट्रो धावू लागली. भारतात ११० कोटी लोकांना काही ना काही योजना मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दिली आहे. भाजपा हा राष्ट्रीयत्वाचा विचार आहे, हा विचार तळागाळात पोहोचवा, अशा सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.
दिशाभूल कशी करावी, हे आपल्या विरोधकांकडून शिकावे. भुयारी मेट्रोसाठी विरोध झाला. फेक नरेटिव्ह केला. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मग यांना माहिती मिळाली की आपली घरे जाणार नाहीयेत. मग मान्यता मिळाली. पण विरोधक उगाचच विरोध करून खिसे भरण्याचे काम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
या वेळी व्यासपीठावर आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, मंदार खंडकर, प्रदेश सचिव विक्रम जैन, जिल्हा, प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
बाळ माने- राजेश सावंत सरावाच्या सूचना
“याप्रसंगी कबड्डीमधील गोष्ट सांगताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार बाळ माने आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना आता पूर्वीसारखा सराव चालू करा, अशा कोपरखळ्या मारल्या. मंत्री चव्हाण म्हणाले, कबड्डीच्या मैदानात काय होतं, चांगले ताकदीचे खेळाडू उतरले, चांगली चढाई करणारे, दिसायला लागले, धावायला लागले की समोरचा संघ म्हणतो आज अ टीम उतरवलेली दिसतेय. समोरचा वयाने थकलेला असेल तर सामन्याला बाय घेतली जाते. बाळासाहेब, असं होऊ शकतं. राजेश सावंत पूर्वीसारखा सराव सुरू करा. कधीही फिट राहिले पाहिजे.“