तुळजाभवानीमातेचा सोन्याचा मुुकुट, मंगळसूत्र गायब

Spread the love

तुळजापूर :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तीदेवता श्री तुळजाभवानीमातेच्या ऐतिहासिक, प्राचीन काळातील एक किलो वजनाचा सोन्याचा मुकुट गायब असल्याचे सोळा सदस्यीय दागदागिने तपासणी समितीच्या निदर्शनास आले आहे. याबाबतचा अहवाल या समितीने जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे. केवळ मुकुटच नाही, तर तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या, दुर्मिळ दागीन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली आहे.
मंदिर संस्थानने उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या १६ सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे. काही महिन्यांपूर्वी मातेच्या सर्वच्या सर्व मौल्यवान,दुर्मिळ दागिन्यांच्या सात पेट्यांमधील वस्तूच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले होते. या समितीने केलेल्या तपासणीत मातेच्या २७ अलंकारांपैकी ४ अलंकार गायब आहेत, तर १२ पदराच्या ११ पुतळ्या असलेले मंगळसूत्रही बेपत्ता असून ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूटही गायब झाला आहे. ही चोरी लपवण्यासाठी सदर दागिन्यांच्या पेटीत दुसरा मुकूट ठेवण्यात आला तसेच पुरातन पादूका काढून नव्या बसविण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. यावर संबंधितावर कुठली कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान दुर्मिळ दागदागिन्यांचे एकूण सात डबे आहेत. हे सर्व मौल्यवान, दुर्मिळ दागिने अंदाजे ३०० ते ९०० वर्षांपूर्वीचे जुने आहेत. डबा क्र.१ मधील दागिने विशेषप्रसंगी वापरण्यात येतात. यामध्ये शारदीय व शाकंभरी नवरात्रौत्सव, मकरसंक्रांत, रथसप्तमी, गुढीपाडवा,अक्षय तृतीया, छत्रपती शिवाजी महाराज जयंती अशा महत्त्वाच्या दिवशी या डब्यातील दागदागिन्यांचा साज तुळजाभवानी मातेस परिधान केला जातो. या डब्यात एकूण २७ प्रकारचे प्राचीन अलंकार आहेत.त्यापैकी चार अलंकार गायब असल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे.
या प्रकरणात दोषी कोण? हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करणार आहे. त्या समितीचा अहवाल एक-दोन दिवसांत येईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page