शाळेच्या वेळा बदलणार

Spread the love

नागपूर :- मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्यानंतर, त्याला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा मिळत आहे. काही शैक्षणिक संस्थांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या सकाळच्या सत्रातील शाळा सात वाजताच्या आसपास भरत असून, ही वेळ नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल. पालकांची सकाळी पाच वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत आहे.
‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी राज्यपाल बैस यांनी सकाळच्या सत्राच्या शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या. बदलत्या जीवनशैलीनुसार प्रामुख्याने शहरी भागांतील पालकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या असून, अनेक पालक रात्रपाळी आणि कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागे असतात. त्यामुळे मुलेही रात्री उशिरापर्यंत जागी असतात. त्यातही मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढला आहे. अनेक मुले रात्री मोबाइल किंवा कम्प्युटर पाहतात. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या (पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक) शाळा सकाळी सातच्या आसपास भरतात. त्यासाठी मुलांना पहाटे सहा वाजल्यापासून, तर पालकांना जेवणाचा डबा आणि मुलांची तयारी करण्यासाठी पहाटे पाच वाजताच उठावे लागते. या सर्वांत मुलांची झोप पूर्ण होत नाहीच; शिवाय पालकांनाही धावपळ करावी लागते. या पार्श्वभूमीवर शाळांच्या सकाळच्या वेळा बदलण्याबाबत अधूनमधून चर्चा होते. मात्र, राज्यपाल बैस यांनी सरकारला सूचना दिल्यामुळे, आता पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकार सकाळी भरणाऱ्या शाळांच्या वेळा बदलणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
‘झोपेच्या गणितानुसार शाळेच्या वेळा बदलण्याबाबत सकारात्मक विचार व्हायला हवा. टीव्ही आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. आई-वडील नोकरी करणारे असल्याने, त्यांच्या कामावरून घरी परतण्याच्या वेळाही रात्री उशिराच्या असतात. अशा वेळी स्वाभाविकपणेच सर्व कुटुंबाला झोपायला उशीर होतो. फक्त शहरातच नाही, तर खेड्यापाड्यातसुद्धा रात्री ११ किंवा त्यानंतर झोपणे अगदी स्वाभाविक मानले जाते. शाळेत जाण्यासाठी म्हणून मुलांना सकाळी लवकर उठवले जाते. अशा वेळी मुले शाळेत पेंगतात, झोपतात. त्यामुळे शिक्षकांच्या शिकवण्याकडे त्या मुलांचे लक्ष नसते.
राज्यातील जवळपास सर्वच शहरांमधील विद्यार्थ्यांची शाळेची वेळ सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान आहे. यामुळे मुलांमध्ये प्रचंड तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्यपाल महोदयांनी संवेदनशिलपणे विचार करून शाळेच्या वेळा बदलण्याचे निर्देश दिले आहेत.
राजभवनामध्ये राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी दिलेल्या भाषणात राज्यपालांनी शालेय विद्यार्थ्यांवर ताण दूर करण्याच्या दृष्टीने आपली मतं मांडली. राज्यपाल बैस यांनी शिक्षण विभागाला शाळांच्या वेळेसंदर्भात सूचना केल्या आहेत . “ई-वर्गांना चालना देणं गरजेचं आहे. यामध्यमातून मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी पुस्तकविहीन शाळेचा विचार करता येईल. गुणवत्तेनुसार शाळांना श्रेणी द्याव्यात आणि यापैकी सर्वोत्तम शाळांना बक्षिसे द्यावीत. या माध्यमातून शाळांमध्ये सुधारणेसाठी स्पर्धा निर्माण होईल,’ असे बैस यांनी नमूद केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page