
*कोल्हापूर/ प्रतिनिधी-* कोल्हापूर येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नदी- नाले ओसांडून वाहत सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अशातच शिरोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. बस्तवड- अकिवाट मार्गावर कृष्णा नदीचा पूल ओलांडताना ट्रॅक्टर उलटल्याने सात जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. शिरोळ येथे तैनात असलेले एनडीआरएफचे पथक शोध आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले, अशी माहिती एनडीआरएफने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीला महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून जनजीवन विस्कळीत झाले. अशातच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंप सुरू करण्यासाठी गावातील काही जण ट्रॅक्टरमधून जात होते. हा ट्रॅक्टर बस्तवड- अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात उलटला. यामुळे या ट्रॅक्टरमध्ये बसलेले सातही लोक पाण्यात बुडाले. यापैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, अजूनही दोन जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
*मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू…*
ग्रेटर नोएडातील दादरी येथील आंबेडकर नगर वसाहतीत बुधवारी रात्री झोपडीवर भिंत कोसळून ६२ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ५० वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दादरी पोलिस ठाण्याचे पथक आंबेडकरनगर कॉलनीत दाखल झाले.
एका भूखंडाची सीमाभिंत शेजारच्या एका झोपडीवर कोसळली. साबूर अली (वय, ६२) आणि त्यांची पत्नी अमीन (वय ५०) हे दाम्पत्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले. एका स्थानिकाने पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ११२ वर संपर्क साधल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त अशोक कुमार यांनी सांगितले की, आमच्या पथकाने तात्काळ ढिगाऱ्याखालून दाम्पत्याला बाहेर काढले आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून त्यांच्या कुटुंबांना याबाबत माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आंबेडकरनगर वसाहतीत तिरुपती एन्क्लेव्ह नावाचा परिसर असून तेथे काही रिकामे भूखंड असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. काही भूखंड मालकांनी आपल्या भूखंडांभोवती सीमाभिंती बांधल्या असून, या भिंतींच्या बाजूला बेघरांनी छोट्या छोट्या झोपड्या बांधल्या आहेत. कोसळलेली भिंत सुमारे आठ फूट उंच असली तरी फारशी मजबूत नव्हती. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीचा पाया कमकुवत झाल्याने ही घटना घडली, असे कुमार यांनी सांगितले