दिवा स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी साबे गावात जाणाऱ्या वाहनांना तलावाच्या बाजूने नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरील फेरीवाले हटवून वाहनांसाठी मार्गिका सुरू करण्याची दिवा मनसेची मागणी
ठाणे ; निलेश घाग दिवा रेल्वे स्टेशन परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. दिवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी वाहनं ही रेल्वे फाटका जवळ उभी राहतात, त्याच वेळी साबे गावातून शीळ फाट्याच्या दिशेने येणारी वाहने आणि शीळ फाट्याकडून साबे गावात जाणारी वाहने ही रेल्वे फाटक परिसरात एकत्र आल्यास तेथील रस्ता अरुंद असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यातच बेशिस्त रिक्षावाले स्टेशन परिसरात पादचारी पुलाच्या खालीच उभे राहतात. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी असे मनसेने आपल्या पत्रात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने सरकते जिने जिथे उतरतात त्याच्या डावीकडे तलावापर्यंत असलेल्या रस्त्यावर डांबरीकरण केले आहे. सदर रस्त्याचा योग्य वापर वाहतुकीसाठी केल्यास साबे गावात जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार होऊ शकते. ज्यामुळे स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
मनसेने सुचवलेल्या पर्यायानुसार सरकत्या जिन्याच्या समोर असलेल्या रिक्षांचा स्टॅण्ड थोडा मागे सरकवून, साबे गावाच्या दिशेनी जाणारी वाहनं रिक्षा स्टँडच्या डाव्या बाजूने तलावाला लागून असलेल्या रस्त्यावरून साबे गावात जाण्यासाठी मार्गिका तयार केल्यास साबे गावातून येणारी आणि जाणारी वाहनं एकमेकांसमोर येणार नाहीत आणि त्यामुळे रेल्वे फाटक परिसरात होणारी वाहतूक कोंडी थोडीफार का होईना पण नियंत्रणात येऊ शकेल. तसेच या रस्त्यावर तलावाकडील बाजूने फेरीवाल्यांनी आपलं बस्तान मांडले आहे त्यावर अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यास रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होईल असे मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
जाहिरात