“माझ्या कुटुंबियांना…”, एसीबीच्या चौकशीनंतर आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया…

Spread the love

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आज (19 मार्च) राजन साळवी आणि त्यांचे पुतणे दुर्गेश साळवी यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली.

ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) आमदार राजन साळवी आणि त्यांचे पुतणे दुर्गेश साळवी यांना आज (19 मार्च) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी बोलावलं होतं. जवळपास दीड तासांच्या चौकशीनंतर राजन साळवी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसंच माझ्याप्रमाणे माझ्या कुटुंबियांना विनाकारण छळणाऱ्या प्रवृत्तीला नियती नक्कीच धडा शिकवेल, असंही साळवी म्हणालेत.

काय म्हणाले राजन साळवी?…

गेली दीड वर्ष शिवसेना (ठाकरे गट) आमदार राजन साळवी यांची एसीबी मार्फत चौकशी सुरु आहे. रत्नागिरी, अलिबाग आणि त्यानंतर आता ठाणे एसीबी कार्यालयाकडून साळवी यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आलं होतं. देशातील केंद्रीय यंत्रणा उद्धव ठाकरेंसोबत जे कोणी आहेत, त्यांच्या मागे अश्या प्रकारे अडकविण्यात येत असल्याचा आरोप यावेळी साळवे यांनी केला. तसंच चौकशीदरम्यान आमच्या सर्व मालमत्तेचा हिशोब मागवण्यात आला होता, तो आम्ही दिलाय, आणि भविष्यातही हवं ते सहकार्य करू, असंही ते म्हणाले.

विरोधकांना भीक घालणार नाही..

पुढं ते म्हणाले की, “माझ्यावर जर कोणाचा राग असेल तर हवी ती कारवाई करु शकता. मात्र, कुटुंबाला त्रास देणं हे काही योग्य नाही. माझ्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल केले गेले हे चुकीचं आहे. तसंच शिवसेनाप्रमुख आणि कोकणाचं वेगळं नातं असून विरोधकांना भीक घालणार नाही”, असा थेट इशारा साळवी यांनी सरकारला दिला.

नेमकं काय आहे प्रकरण?….

राजन साळवी यांच्यावर ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 या 14 वर्षांमध्ये बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. साळवी यांच्याकडं 3 कोटी 53 लाखांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची एकूण संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप एसीबीनं केला आहे. यापूर्वी राजन साळवी सात वेळा एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्याचा भाऊ, पुतण्या, वहिनी तसंच स्वीय सहायक यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांची चौकशी देखील एसीबीनं केली आहे. या प्रकरणात राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी तसंच मोठ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page