
राज्यामध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर पक्षांतर वाढले आहे. आता भाजपचे प्रवक्ते व माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे भाजपमधून बाहेर पडत शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
अजित पवारांमुळे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा भाजपला रामराम..
सोलापूर : विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे जागावाटप, बैठका आणि उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला इच्छुकांची देखील लगबग सुरु आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर वाढली असून शरद पवार गटामध्ये अनेक नेते प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीमधील आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला लागला आहे. या नेत्याची घरवापसी होणार असून त्यांनी अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून मी भाजप सोडून शरद पवार गटामध्ये जात असल्याचे म्हटले आहे.
माजी मंत्री आणि भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र त्यांचे कारण हे भाजपमधील वाद नसून भाजपचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार हे आहेत. अजित पवारांना कंटाळून भाजप पक्ष सोडत असल्याचे लक्ष्मण ढोबळे म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी ढोबळे यांची शरद पवारांसोबत भेट झाली होती. तेव्हापासून लवकरच ते घरवापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. या चर्चा आता खऱ्या ठरल्या असून लक्ष्मण ढोबळे हे भाजप सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
काय म्हणाले लक्ष्मण ढोबळे?
भाजपला सोडचिठ्ठी दिलेले लक्ष्मण ढोबळे यांनी अजित पवारांवरील रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “भाजपा सोडण्याच्या मनस्थितीत येऊन रामाची साथ लक्ष्मणाने सोडली. लक्ष्मणाच्या कष्टाचं चिज झालं नाही असं वाटलं. आता स्वामीनिष्ठेने शरद पवारांबरोबर राहणार आहे, त्यांची सेवा करणार आहे. त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार आहे. दोन दिवसांत माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या मतदारसंघात जो विद्यमान आमदार आहे त्याची अडचण होऊ नये, त्याला मोकळीक मिळावी म्हणून मी तिथून बाजूला होतो आहे.” असे देखील मत लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.
पुढे त्यांनी अजित पवारांवर रोष व्यक्त करत सांगितले की, “अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलो, आता ते भाजपाबरोबर आले आणि पुन्हा त्रास देऊ लागले. अजित पवारांच्या या त्रासाला कंटाळून आता पुन्हा मी भाजपा सोडतो आहे, अजित पवारांना वाटतं की पैशांचा जिवावर राजकारण करता येतं, मात्र तसं होत नाही. तुमच्या काकांनी कसं राजकारण केलं ते पाहा, मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, मात्र आता राष्ट्रवादी प्रवेश निश्चित आहे. आपला राजीनामा भाजपला पाठवून देतोय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतोय,” असे मत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले आहे.