आमदार शेखरजी निकम यांच्या माध्यमातून कासारकोळवण पंचक्रोशीतील अनेक विकासकामे मार्गी; बावनदीवरील पूलासाठी आमदार शेखर निकम यांचा पुढाकार…

Spread the love

कासारकोळवण येथील बावनदीवर मोठा पूल व्हावा या मागणीचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील यांनी दिले निवेदन

देवरूख- संंगमेश्वर तालुक्यातील देवरूख- मार्लेश्वर मार्गावरील कासारकोळवण गावाला जोडणाऱ्या बावनदीवर मोठा पूल व्हावा या मागणीचे निवेदन कासारकोळवण गावच्या सरपंच मानसी करंबेळे, उपसरपंच प्रकाश तोरस्कर व पोलीस पाटील महेंद्र करंबेळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना आज सोमवारी मुंबईतील विधानभवन येथे सादर केले. यावर आपण पूलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असा ठाम शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला आहे. चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे नमुद करण्यात आले कि, आमचे निसर्ग संपन्न कासारकोळवण हे गाव देवरूख या तालुक्याच्या ठिकाणाहून सुमारे १० कि. मी. अंतरावर व देवरूख-मार्लेश्वर या मुख्य रस्त्यालगत असूनही आजवर गावात एसटी बससुध्दा पोहचलेली नाही. त्यामुळे अनेक विकासाच्या बाबींपासून आम्ही वंचीत आहोत. यात बावनदी पूलावर मोठा पूल नसल्यामुळे आमची फार मोठी अडचण होत आहे. हा प्रश्न आजवर अनेक कारणांमुळे प्रलंबीत राहिला आहे.

मात्र आमदार शेखर निकम सरांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर सर्व अडचणी आता सुटल्या आहेत. आता मोठी अडचण आहे ती या पूलासाठी आवश्यक असलेल्या निधीची. प्रस्तावीत असलेला हा पूल बांधल्यानंतर गावच्या विकासाला अनेक अंगाने चालना मिळेल. जवळच असलेल्या मार्लेश्वर पर्यटन स्थळामुळे आमच्या गावात आणि परिसरात कृषी / निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल. वाहतुकीची सोय झाल्याने परिसरात रोजगार / व्यवसाय वाढतील. एकूणच आमचे गाव आणि परिसरातील ९-१० गावांसाठी हा पूल जीवनवाहिनी ठरेल. अशी आमची खात्री आहे. या सर्व बाबींचा विचार करून या पूलाच्या बांधकामासाठी आवश्यक तो निधी मंजूर करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कासार कोळवण हे गाव अतिशय दुर्गम भागात असून दळणवळणासाठी बावनदीवर मोठा पूल होणे गरजेचे आहे. यासाठी कासारकोळवण गावच्या सरपंच सौ. मानसी महेंद्र करंबेळे, उपसरपंच प्रकाश धोंडू तोरस्कर व पोलीस पाटील महेंद्र रामचंद करंबेळे यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम सर यांच्यासमवेत पुलाचे काम मार्गी लागवे याकरीता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज सोमवारी विधानभवन येथे भेट घेतली. व निवेदन सादर केले. या भेटीमध्ये त्यांनी सांगितले की, आम्ही हा तुमचा ज्वलंत प्रश्न लवकरच निकाली काढू, असा ठाम शब्द दिला. यासोबतच सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्रजी चव्हाण व उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनाही निवेदने दिली असून लवकरच या पूलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page