येत्या तीन दिवसात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज…

Spread the love

मुंबई : उत्तर भारतात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. सोमवारपासून पुढील तीन दिवस तापमानात पाच ते सात अंश सेल्सिअसपर्यंतची वाढ होण्याचा अंदाज आहे. तर काही राज्यांत उन्हाच्या कडाक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
       

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ मार्चपासून ३ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील काही भाग, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आदी राज्यांमधील वातावरण बदलणार आहे. यातील केरळ आणि कर्नाटकात २ आणि ३ एप्रिलला मुसळधार पाऊस कोसळेल, असाही अंदाज आहे. तर पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये १ ते ३ एप्रिल, महाराष्ट्रातील विदर्भात १ एप्रिल, पूर्व मध्य प्रदेशात २ आणि ३ एप्रिल, उर्वरित महाराष्ट्र, गुजरातमध्ये ३१ मार्च ते ३ एप्रिल, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकात १ ते ३ एप्रिल या कालावधीत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. जोरदार वाऱ्यासह वादळी तडाख्याचीही शक्यता आहे. या राज्यांमध्ये वातावरणात अचानक बदल होणार असून, काही ठिकाणी ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.
      

गेल्या २४ तासांत पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, आसाममध्ये जोरदार वारे वाहत होते. पश्चिम बंगालच्या काही भागांत उष्णतेच्या लाटांनी तडाखा दिला.अरुणाचल प्रदेशात ३० आणि ३१ मार्च, त्रिपुरात ३१ मार्च या कालावधीत जोरदार वारे वाहतील. तर पाऊस आणि वादळी वाऱ्याचाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम हिमालयाचा भाग, मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतात वातावरणात कोणताही बदल होणार नाही असा अंदाज आहे. बिहार राज्यातील काही भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे.
     

पश्चिम बंगालसह, सौराष्ट्र, कच्छ आदी भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून ३१ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आसाममध्ये ३० मार्चपासून १ एप्रिल, त्रिपुरामध्ये ३० मार्चपासून ३ एप्रिल, तामिळनाडू, पद्दूचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, यनम, केरळ आदी ठिकाणी ३० आणि ३१ मार्च या कालावधीत पारा वाढणार असून, आर्द्रताही वाढणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page