बंगळूर : कर्नाटक विधान परिषदेवर काँग्रेसचे सात, भाजपचे तीन आणि जेडीएसच्या एका उमेदवारासह एकूण ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार काँग्रेसला सात जागा, तर भाजपला तीन आणि जेडीएसला एक जागा मिळणार होती. तितक्याच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र डॉ. यतिंद्र, कर्नाटक अल्पसंख्याक आयोगाच्या माजी अध्यक्षा बिल्किस बानो, लघु पाटबंधारे मंत्री एन. एस. बोसाराजू, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार के. गोविंदराज, केपीसीसीचे कार्याध्यक्ष वसंत कुमार, माजी आमदार इव्हान डिसोझा, काँग्रेस पक्षाचे गुलबर्गा जिल्हाध्यक्ष जगदेव गुडे यांची यामध्ये निवड केली आहे.
भाजपने माजी राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, एमएलसी आणि कौन्सिलचे विरोधी पक्ष प्रमुख एन. रविकुमार आणि पक्षाचे नेते एम. जी. मुळे यांना उमेदवारी दिली होती. ‘जेडीएस’चे टी. एन. जावराई गौडा यांचीही बिनविरोध निवड झाली.