‘ईव्हीएम’विरोधात आता न्यायालयात धाव ‘हे’ आहे कारण …

Spread the love

पुणे : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आले असताना, पुण्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘व्हीव्हीपॅट’मधील मतांच्या चिठ्ठ्या मोजण्याची मागणीही त्यांनी केली असून, त्यासाठी निवडणूक आयोगाकडे शुल्क भरण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या कथित घोटाळ्याबाबत पुणे शहरातील महाविकास आघाडीच्या सर्व पराभूत उमेदवारांनी विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्याशी चर्चा केली.

 
या वेळी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार रमेश बागवे, हडपसरचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप, खडकवासला मतदारसंघातील सचिन दोडके, शिवाजीनगरचे दत्तात्रय बहिरट, शिरूरचे अशोक पवार, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, अभय छाजेड, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे उपस्थित होते. या वेळी ईव्हीएम हॅकिंग कशा प्रकारे झाले, याचा दावा करणारे सादरीकरण जगताप यांनी केले.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएम घोटाळ्याबाबत महाविकास आघाडीच्या निर्णयाची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. जगताप म्हणाले, ‘हा विजय महायुतीचा नाही, तर ईव्हीएममधील घोटाळ्याचा आहे. इस्रायली कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून मतदान यंत्रात फेरफार करण्यात आला. यामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या मतदानात १५ ते २० टक्के वाढ करण्यात आली.

 
रडीचा डाव खेळून महायुतीने हा विजय मिळविला असून, हे उघडकीस आणण्यासाठी व्हीव्हीपॅटमधील मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी केली जाणार आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास आवश्यक ते शुल्क भरून ही मतमोजणी करण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

…तसेच या ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारीदेखील झाली आहे.’…

‘ईव्हीएम’मध्ये तीन युनिट असतात. मतदान यंत्र केंद्रात येईपर्यंत एकदा इंटरनेटशी जोडून चिन्ह जोडले जाते. मतपत्रिकेमध्ये पारदर्शकता होती. ‘ईव्हीएम’मध्ये २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंतची एका दिवसाची प्रणाली आधीच फेरफार केला होता. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मते मिळाल्याचा आरोप जगताप यांनी केला.

जयंत पाटील, रोहित पवार यांच्याबाबत अंदाज चुकला निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक मतदारसंघांतील उमेदवारांना एकसारखी मते पडली आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील, रोहित पवार यांना मतदान यंत्रात फेरफार करून पाडायचे होते. मात्र, त्यांना मिळणाऱ्या मतदानाचा योग्य अंदाज न आल्याने यंत्रात मतदान कमी फेरफार केला गेला. या दोन्ही नेत्यांना मतदारांनी अधिक मतदान केले. त्यामुळे विरोधकांचा अंदाज चुकला आणि हे दोघे कमी मताधिक्याने निवडून आल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page