मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप सर्वाधिक 155 जागांवर लढणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 78 तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 55 जागा सोडण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा सुरू होईल. तत्पूर्वी, 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 तारखेपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील तिन्ही प्रमुख घटकपक्षांचे नेते शु्क्रवारी जागावाटप निकाली काढण्यासाठी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यात जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
काही जागांवरील तिढा अमित शहांच्या सूचनेनुसार सुटेल…
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. काही जागांवर पेच आहे. पण तो अमित शहा यांच्या सूचनेनुसार राज्य पातळीवर सोडवण्यात येईल. दिल्लीत अमित शहांशी चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात परतलेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही दिल्लीत ठाण मांडून आहेत. ते इतरही काही नेत्यांची भेटीगाठी घेणार असल्याची माहिती आहे.
भाजप 155 जागा लढवणार असल्याचा दावा…
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, राज्यात भाजप सर्वाधिक 155 जागा लढवणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना 78, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस अवघ्या 55 जागांवर लढणार आहे. भाजप आपल्या कोट्यातून छोट्या पक्षांना जागा देईल. त्यातही एखाद्या पक्षाकडे जिंकून येण्याची क्षमता नसणारा उमेदवार नसल्याच्या स्थितीत 5 जागा प्लस-मायनस होतील.
ज्या ठिकाणी उमेदवाराविरोधात सत्ताविरोधी लाट असेल त्या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने जागांची अदला-बदली करण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती आहे. अमित शहा यांनी सर्वच पक्षांना प्रचाराच्या कामाला लागण्याचे आदेश दिलेत.
महाविकास आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच…
दुसरीकडे, महायुतीचे जागावाटप निकाली निघाल्याची चर्चा असली तरी विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही कायम आहे. जागावाटपाच्या मुद्यावर काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटात बिनसल्याचीही चर्चा आहे. यामुळे ही चर्चा आणखी लांबण्याची भीती आहे. पण काँग्रेस व ठाकरे गटाने असा कोणताही वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.