
मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत बातमी समोर आली आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच या कालावधित राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला दोन्ही सभागृहात दुपारी दोन वाजता मांडण्यात येणार आहे.
आज मंगळवारी विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे हे उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशना पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचं अभिभाषण होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर केला जाईल. पुढे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. तसेच 2023-24 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारीला शासकीय कामकाजाला सुरुवात होईल. त्यानंतर अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी या अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा करण्यात येणार आहे.