शरद पवार यांना साताऱ्यात सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण शरद पवार यांच्या पक्षाच्या बड्या नेत्याने आज तब्बल 5 हजार समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
शरद पवार यांना साताऱ्यात मोठा झटका…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना साताऱ्यात मोठा झटका बसला आहे. कारण शरद पवार यांच्या पक्षाचे साताऱ्यातील दिग्गज नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे साताऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीचं गणितं बदलण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामुळे शरद पवार यांना साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी हा मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या या दिग्गज नेत्याचं नाव माणिकराव सोनवलकर असं आहे. माणिकराव सोनवलकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सोनवलकर यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव सोनवलकर यांच्यासोबत शरद पवार गटाच्या जवळपास 5 हजार कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोनवलकर हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला साताऱ्यात आगामी विधानसभेत मोठा फायदा होणार आहे.
माणिकराव सोनवलकर यांचं भाजपा पक्षात स्वागत….
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी माणिकराव सोनवलकर यांचं पक्षात स्वागत केलं. “माणिकराव सोनवलकर हे शिक्षक आहेत. तसेच ते जिल्हा परिषद नेता आहेत. ते 5 हजार कार्यकर्त्यांसह आज भाजपात सहभागी झाले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे साताऱ्यात भाजपला मोठं यश मिळेल”, असं चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. “माणिकराव सोनवलकर हे साताऱ्यातील बडे नेते आहेत. त्यांनी भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावेळी माणिकराव सोनवलकर यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
बावनकुळे यांचा मविआवर निशाणा…
“महाविकास आघाडीचे नेते जनतेत मतभेद आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते जात, धर्मावरुन नागरिकांना भडकवण्याचं काम करत आहेत. राज्यात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा विरोधी पक्षात कोणत्याही प्रकारचं घाणेरडं राजकारण व्हायचं नाही. पण तसं राजकारण आज विरोधी पक्षांकडून होत आहे. काँग्रेस लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रात घडामोडी वाढल्या…
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखत आहेत. याच रणनीतीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांमधील ताकदवान नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. साताऱ्यात अशीच घटना बघायला मिळत आहे. साताऱ्यातील नेते माणिकराव सोनवलकर यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपला किती फायदा होतो ते आगामी काळात स्पष्ट होईल.