यशश्री शिंदेच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे एक टॅटू आरोपी दाऊद शेखच्या नावाने गोदंवला असल्याचे समोर आले आहे.
*नवी मुंबई/ उरण/ प्रतिनिधी-* संपूर्ण राज्यात खळबळ माजवलेल्या उरण हत्याकांडामध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे. मृत यशश्री शिंदेच्या (Yashshree shinde murder case) शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे एक टॅटू आरोपी दाऊद शेखच्या नावाने गोदंवला असल्याचे समोर आले आहे. उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून दाऊदने यशश्रीची हत्या केली होती. आता टॅटू प्रकरणामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे.
पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मृत यशश्री हिच्या शरीरावर दोन टॅटू आढळले होते. त्यातील एका टॅटूमध्ये आरोपी दाऊद शेखचे नाव लिहिले होते. मिळालेल्या माहितीनुसार यशश्रीने हा टॅटू यावर्षी फेब्रुवारी महिन्यात काढला होता तसेच हा टॅटू काढताना दाऊद शेखही तिच्यासोबत होता. दाऊद शेखने जबरदस्तीने तिला टॅटू काढायला लावले की, तिने आपल्या मर्जीने शरीरावर गोंदवून घेतले, याचा शोध घेण्यासाठी पोलिस टॅटू आर्टिस्टला शोधत आहेत.
यशश्री शिंदे लग्नाला नकार देत होती, तसेच भेटायला येत नसल्याने दाऊद शेखने तिला संपवले. दाऊदच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने एकदा भेटून सगळा विषय संपवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आरोपीला तिचा बदला घ्यायचा होता. दोघांच्यात वाद सुरू झाला व रागाच्या भरात त्याने चाकूने सपासप वार करत तिची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी सांगितले की, हत्येत वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. दोघांचा मोहसीन कॉमन मित्र होता. त्याच्या चौकशीत तो या कृत्यात सहभागी असावा असे वाटत नाही. दाऊद आणि यशश्री हे १० वी पर्यंत एकात शाळेत शिकले आहेत. आरोपी दाऊदने तिचा शाळेत असतानाच विनयभंग केला होता. त्याबद्दल त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करून त्याला अटकही झाली होती. मात्र, सुटकेनंतर तो पुन्हा जबरदस्तीने यशश्रीच्या मागे लागला होता. तो तिचा पाठलाग करत होता, तिने त्याच्यासोबत लग्न करुन बंगळुरूला यावे, असा तगादा त्याने लावला होता. मात्र मुलीने नकार देताच त्याने तिचा खून केला.