छत्रपती संभाजीनगर- मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल, असे फडणवीस म्हणाले. वरिष्ठांची चर्चा सुरू असून तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस एका लग्न समारंभानिमित्त बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत तसेच मंत्रिमंडळाबाबत भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही त्यांनी आपले मत मांडले.
मुख्यमंत्री पदाबाबत लवकर उत्तर मिळेल…
मुख्यमंत्रीपदाबाबत तिनही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील. आमच्या श्रेष्ठींसोबत सगळ्यांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे याचे उत्तर लवकरच मिळेल, असे फडणवीस म्हणाले. पुढे ते म्हणाले. आधी मुख्यमंत्री ठरेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री इतर मंत्री ठरतील. मुख्यमंत्रिपदानंतर इतर मंत्र्यांची नावे समोर येतील.
विरोधी पक्षांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे…
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांच्या ईव्हीएमवरील आरोपांवर प्रत्युत्तर देत निशाणा साधला. काल सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत होत असलेल्या चर्चेबाबत उत्तर दिले आहे. तुम्ही हरले तर ईव्हीएम वाईट, ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टेम्परप्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत सुरूच राहणार आहे, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
मनपा निवडणुकीसंदर्भात बोलणे टाळले…
स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवायचे की नाही, हे आम्ही निर्णय घेऊ, त्याला अजून वेळ आहे, असे फडणवीसांनी सांगितले. पण महापालिका निवडणुकीसंदर्भात काहीही बोलणे त्यांनी टाळले.