मुंबई- मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोघांकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. तर भाजपकडे सर्वाधिक 132 आमदार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यातच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. अशात एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
एकनाथ शिंदे महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेणार आहेत, तर त्यांचे खासदार दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीला गेले आहे…
एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे नेते त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहे. सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे आपली भूमिका जाहीर करतील.
सर्व प्रश्नांची उत्तर आज कदाचीत मुख्यमंत्री देतील…
एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषद घेण्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली याचा अर्थ त्यामध्ये निश्चित काहीतरी बातमी असणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार? उपमुख्यमंत्री कोण होणार? केंद्रातून ऑफर कोणाला आली? या सर्व प्रश्नांची उत्तर आज कदाचीत मुख्यमंत्री देतील. एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमके काय चालले आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री जेव्हा त्यांच्या दाढीवरून हात फिरवतात, त्यावेळी निश्चित काही तरी घडते, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
4 दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र…
महाराष्ट्रात कुणाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपला एकट्याला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यात. विशेषतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानंतरही महायुतीने आपला नवा कारभारी घोषित केला नाही. सूत्रांच्या मते, भाजप नेतृत्वाला जातीय समीकरणापासून एनडीएच्या सर्वच सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. यामुळेच गत 4 दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
एकनाथ शिंदे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री..
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 57 व राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. भाजपने या निवडणुकीत आपले 149 उमेदवार दिले होते. तर शिवसेनेने 81 व राष्ट्रवादीने 59 जणांना तिकीट दिले होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला आहे. एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा राज्यशकट हाकतील.