१५ वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात ; मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही सुदृढ करावी – उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड..

Spread the love

रत्नागिरी : तरुण म्हणजे देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवावित. आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला सुदृढ करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले.

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात १५ वा राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आज आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारूती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आशा जगदाळे, दिव्यांग मतदारांचे आयकॉन संकेत चाळके, शक्ती सेवा संस्थेच्या अध्यक्ष तसेच तृतीयपंथी मतदारांच्या आयकॉन पल्लवी परब, युथ आयकॉन शिवम परब आदी उपस्थित होते.

प्रारंभी भारत निवडणूक आयोगाच्या नथिंग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर या थीमचे प्रसारण करण्यात आले. त्यानंतर उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी उपस्थितांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली. श्री. गायकवाड यांनी २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका निर्भय वातावरणात पार पडल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने या ठिकाणी निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडणे कौशल्याचे काम होते. ती कामगिरी सर्वच कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडल्याचे गौरवोउद्गार त्यांनी काढले.

श्री. हेगशेट्ये यांनी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा होणे म्हणजे खऱ्या अर्थाने युवकांमध्ये जागृतीचे मोठे अभियान प्रशासनामार्फत राबविले जात असल्याचे सांगितले. जात, धर्म, लिंग यापलीकडे एकच गोष्ट समान आहे ती म्हणजे मतदान. संविधानाने सर्वांनाच याबाबतीत एकाच पातळीवर आणून ठेवले आहे. त्यामुळे आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, असे सांगून आमच्या महाविद्यालयातील सर्व पात्र नवमतदार मतदान नोंदणी करून नक्कीच आपला मतदानाचा हक्क बजावतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

श्री. बोरकर यांनी निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा, मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून २५ जानेवारी २०११ पासून हा दिवस साजरा केला जात असल्याचे नमूद करतानाच सर्व प्रकारचे घटक यात सामील व्हावे यासाठी “स्विप”अंतर्गत विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मोबाईल मधील विविध ॲपच्या माध्यमातून ही बसल्या जागेवर मतदार यादीत आपले नाव नोंदवता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्कृष्ट काम केलेले बीएलओ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, महाविद्यालयीन स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल अधिकारी आणि विविध क्षेत्रातील दिव्यांग व तृतीय पंथीय आयकॉन यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

प्राचार्य डॉ. जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली. कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपणाने झाली. सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले. प्रांताधिकारी श्री. देसाई यांनी आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page