*मुंबई-* वरळी विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुतीने फुलप्रूफ प्लॅन तयार केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मदतीने ही रणनीती यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलिस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता यासह अनेक विषयांवर मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली. हे मुद्दे वरळी आणि वडाळा विधानसभा मतदारसंघात प्रभाव टाकणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. मनसेने वरळी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आतापासून येथे काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. भाजपचे उमेदवार नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांनी निवडणूक प्रचारसभाही घेतली.
*वरळीत ठाकरे गटाचा कमी झाला आहे जनाधार!..*
राज ठाकरेंनी वरळी विधानसभेच्या जागेवरच जास्त लक्ष का केंद्रित का केले, यासाठी अनेक कारणे दिली जात आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या निर्णायक आहे. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये या मतदारसंघात ठाकरे गटाचा जनाधार कमी झाला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघात एकूण ८९२४८ मते मिळाली होती.
पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला केवळ ६४,८४४ मते मिळाली, तर शिंदे गटाला येथे ५८,१२९ हजार मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ ६७१५ मतांची आघाडी मिळाल्याने मनसेचा उमेदवार येथून निवडणूक जिंकू शकतो, असे राज ठाकरे यांना वाटते. विधानसभा निवडणुकीत वरळीत मनसेच्या उमेदवाराविरोधात शिंदे गट उमेदवार उभा करणार नाही. या जागेवर शिंदे गट मनसेला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे, असे राजकीय जाणकार सांगतात.