*जालना-* मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात 500 हजार कोटींचा घोटाळा झाला असून यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारने चौकशी करायला हवी. त्यातून अनेक बडे मासे समोर येतील, असा आरोप ओबीसी समाजाचे आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची मनोज जरांगे पाटील यांची धमक नाही. त्यांचे सर्व नियोजन हे स्क्रिप्टेड असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा आंदोलकांकडून बॅनरबाजी करण्यात आली, यावर देखील नवनाथ वाघमारे यांनी जोरदार टीका केली आहे.
राज्यात मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असा वाद सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रात अनेक जाहिराती दिसल्या. या जाहिराती करण्यासाठी एवढा पैसा येतो कुठून? असा प्रश्न ओबीसी आरक्षणाचे आंदोलक वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. मराठा आंदोलनाच्या दरम्यान खर्च झालेल्या पैशांमध्ये शंभर कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. त्याला देखील नवनाथ वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शंभर नाहीतर पाचशे हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शरद पवार यांनी देखील ओबीसी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचा आरोप प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केला होता. त्यानंतर आता नवनाथ वाघमारे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना ओबीसी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांनी अद्याप मराठा आणि ओबीसी आरक्षणावर भूमिका स्पष्ट केलेली नाही. तशी भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, अशी मागणी देखील वाघमारे यांनी केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या बालिश माणसांमुळेच मराठा समाजाचे नुकसान होत असल्याची टीका देखील नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्यांनी तशी फसवणूक करायला नको, असे आवाहन देखील त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील उमेदवार जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. मात्र मालकाचा आदेश नसल्यामुळे त्यांनी तसे केले नाही. मनोज जरांगे पाटील यांना मालकाचा जो आदेश येईल त्याचप्रमाणे ते वागतात आणि बोलतात, असा आरोप देखील नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.