समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा जागीच मृत्यू; २ जण गंभीर जखमी…

Spread the love

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला आहे. सुसाट वेगात जाणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मृतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (वय ३५) यांच्यासह संदीप साखरवाडे (वय ४०) यांचा समावेश आहे. तर, रितेश भानादकर (वय २४) आणि आशिष सरवदे (वय ३७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त व्यक्ती हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून ते आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते.

तिथून परतत असताना हा भीषण अपघात घडला. छत्रपती संभाजीनगर हर्सुल सावंगी परिसरातील नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक ४३६ वर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने थेट समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. त्याचबरोबर मृतदेह ताब्यात घेऊन अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page