महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची भेट; घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, सुप्रिया सुळेंची मात्र टीका….

Spread the love

जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय….


जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरून केली. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, आज महिला दिन आहे. त्यामुळे आमच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार आहे. तसेच या निर्णयाचा फायदा नारी शक्तीला होणार आहे.

केंद्र सरकारने कालच (दि. ७ मार्च) मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या अनुदानात ३०० रुपयांची सूट देण्याच्या योजनेला एक वर्षांची वाढ दिली होती. आता मार्च २०२५ पर्यंत ही सूट दिली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय; महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ, एलपीजी सिलिंडरवर ३०० रुपयांची सूट…

पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले की, आम्ही आमच्या नारी शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला सलाम करतो. तसेच महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षण, उद्योग, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण्यासाठी कटिबद्ध आहोत.

सिलिंडरचे दर अर्ध्यावर आणावेत – सुप्रिया सुळे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळे यांनी मात्र टीका केली आहे. मोदी सरकार मागच्या पाच वर्षांपासून सत्तेत आहे. मग सिलिंडरच्या दरात कपात करण्यासाठी आजचाच मुहूर्त का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अवघ्या काही दिवसांवर आता लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक जुमला आहे. हा एक राजकीय निर्णय असून त्यात महिलांना दिलासा देण्याचा कोणताही उद्देश दिसत नाही. आमच्या काळात गॅस सिलिंडर ४३० रुपयांना मिळत होता. महिलांवरील आर्थिक भार कमी करायचा असेल तर सिलिंडरचे अर्ध्यावर आणायला हवेत.

१ मार्चला व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये वाढ…

एक मार्चपासून व्यावसायिक वापराच्या १९ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडर्सच्या किमतींमध्ये तब्बल २५ रुपये वाढ करण्यात आली. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरचे दिल्लीमधील दर १७९५ रुपये तर मुंबईत १७४९ रुपयांना व्यावसायिक सिलिंडर मिळत आहे. चेन्नई व कोलकात्यामध्ये हेच दर अनुक्रमे १९६० आणि १९११ रुपये इतके आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page