पुणे- राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळाले. आज कोकणच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.
वाढत्या उन्हामुळे आरोग्यविषयक अनेक तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रामुख्याने डोके दुखी, त्वचा कोरडी पडणे, लघवी कमी प्रमाणात येणे, पिवळी लघवी येणे, शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे, डोळ्यांची आग होणे या प्रकारचा त्रास अनेकांना होत आहेत. याप्रकारची लक्षणे तीव्र स्वरुपात जाणविल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावा व उन्हापासून बचाव करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून, गेले काही दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तर, बीड, धाराशीव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.