राजापूर- राजापूर तालुका ब्राह्मण समाजाने आयोजित केलेला ज्ञाती बांधवांचा मेळावा हा खरोखरच दृष्ट लागण्याजोगा कार्यक्रम म्हणून याचा उल्लेख करावा लागेल. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपण केलेला सन्मान हा त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. समाजातील अशा घटकांची नोंद घेऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान करणे ही बाब नक्कीच अभिनंदनीय आहे. ज्ञाती बांधवांनी आज जशी एकजूट दाखवली अशीच एकजूट भविष्यात कायम ठेवत, राष्ट्र महत्त्वाचे मानून हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र या . भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे , असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी केले.
राजापूर तालुका ब्राह्मण सेवा मंडळ आयोजित ज्ञाती बांधवांचा मेळावा आज करंबेळकर यांच्या श्री गजानन मंगल कार्यालय ओणी येथे संपन्न झाला. या मेळाव्याला तालुक्यातील ६०० पेक्षा अधिक ज्ञाती बांधव उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर ब्राह्मण सेवा मंडळ राजापूरचे अध्यक्ष प्रवीण शशिकांत करंबेळकर, सचिव बापट, लेखक आणि पत्रकार जे. डी. पराडकर उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर भगवान श्री परशुराम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. मंडळाचे सचिव बापट यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी ज्ञाती बांधवांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि देणगीदारांच्या सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
मंडळाचे अध्यक्ष प्रवीण करंबेळकर यांनी आपल्या मनोगतात आम्ही ९९% ज्ञाती बांधवांपर्यंत प्रत्यक्ष निमंत्रण घेऊन पोहोचलो होतो. या महिन्यातील गेल्या तीन रविवारी सलग पूर आल्याने या चौथ्या रविवारी पावसामुळे उपस्थिती कशी व किती असेल याबाबत आम्ही शाशन्क होतो. आ
ज दोनशे ज्ञाती बांधव उपस्थित राहतील असे वाटत असताना आपण सहाशेची उपस्थिती दाखवून जो भरघोस प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मंडळ आपल्या सर्वांचे अत्यंत आभारी आहे. मंडळातर्फे सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची करंबेळकर यांनी आपल्या मनोगतात माहिती दिली. मंडळातर्फे कुलकर्णी आणि पराडकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात सुशील कुलकर्णी पुढे म्हणाले की
“अनेक चुकीच्या आणि न घडलेल्या कपोलकल्पित गोष्टी आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न पूर्वीपासून होत आला आहे. आपण अभ्यासपूर्ण रीतीने आणि योग्य ते दाखले देत याला विरोध करायला शिकले पाहिजे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. पुराणातील अनेक दाखले देत त्यांनी वस्तुस्थिती आणि कपोकल्पित गोष्टी यातील फरक अत्यंत ओघवत्या शैलीत उपस्थितांना समजावून सांगितला. आज ज्ञाती बांधव म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने जसे एकत्र आलो, तसे राष्ट्र प्रथम या विचाराने हिंदू म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आपल्या चाळीस मिनिटांच्या मार्गदर्शनात त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. समाजात पसरवल्या जाणाऱ्या कपोकल्पित गोष्टी खऱ्या न मानता, सत्य सर्वांसमोर आणण्याचे धाडस ज्ञाती बांधवांनी दाखवणे, ही काळाची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी जे. डी. पराडकर आपल्या मनोगतात म्हणाले की,
“ज्ञाती बांधवांना मार्गदर्शन करण्याएवढा मी नक्कीच मोठा नाही. मात्र प्रमुख अतिथी म्हणून बोलवल्यानंतर थोडं फार बोललं पाहिजे या नात्याने मी आज आपल्याशी संवाद साधत आहे. आजची ही उपस्थिती पाहून मन भरून आले. अशीच उपस्थिती यापुढील सर्व कार्यक्रमांना दाखवून ज्ञाती बांधवांनी आपल्यातील एकजूट कायम ठेवणे गरजेचे आहे. एखाद्या प्रसंगी परस्परात मतभेद होऊ शकतात, मात्र ते मनभेदापर्यंत कधीही पोहोचणार नाहीत याची काळजी घ्या. आज विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि काही यशस्वी व्यक्तींचा जो सन्मान केला, हे नक्कीच आवश्यक आणि कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राजापूर तालुका ब्राह्मण सेवा मंडळाने आजच्या मेळाव्याचे योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करून दाखवल्याबद्दल पराडकर यांनी मंडळाला धन्यवाद दिले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी समाजातील यशस्वी व्यक्ती आणि विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभाकर पंडित यांनी लिहिलेल्या ‘ कथाकल्पतरू ‘ आणि कोणी पूर्व विभाग ब्राह्मण संघ यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘ नित्य उपासना ‘ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात स्थानिक कलाकारांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमांना उपस्थित सर्वांनी उत्तम दाद दिली. मेळाव्यासाठी ज्ञाती बांधवांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल राजापूर तालुका ब्राह्मण सेवा मंडळ यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहर्ष आपटे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.प्रकाश पाध्ये यांनी केले.