हैदराबाद- सनरायझर्स हैदराबाद एक्सप्रेस बुधवारी सुसाट धावली. लखनऊच्या संघाला हैदराबादने १६५ धावांत रोखले होते. विजयासाठी १६६ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीरांनी तुफानी सुरुवात करून दिली आणि त्यामुळेच हा सामना मोठ्या फरकाने हैदराबादला जिंकता आला. या मोठ्या विजयासह हैदराबादच्या संघाने प्ले ऑफच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. कारण या विजयामुळे त्यांना दोन गुण मिळाले असून ते तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. हैदराबादच्या संघाने यावेळी तब्बल १० विकेट्स आणि ६२ चेंडू राखत लखनौवर मोठा विजय मिळवला.
ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांची सलामी यावेळी हैदराबादच्या विजयात सर्वात मोलाची ठरली. ट्रेव्हिस हेडने यावेळी ३० चेंडूंत ८ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद ८९ धावा केल्या, तर अभिषेक शर्माने नाबाद २८ चेडूंत ८ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद धावा करत हेडला सुरेख साथ दिली. हैदराबादने या मोसमात पहिल्यांंदाच एकही विकेट न गमावता विजय मिळवल्याचे पाहायला मिळाले.
ट्रेव्हिस हेट आणि अभिषेक शर्मा यांनी लखनौच्या गोलंदाजीची पिसे काढल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी सुरुवातीपासूनच धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळे हैदराबादच्या संघाला पहिल्या पॉवर प्लेच्या ६ षटकांमध्येच तब्बल १०७ धावा करता आल्या. तिथेच हैदराबादच्या संघाने विजयासाठी भक्कम पाया रचला. कारण त्यानंतर लखनौचे १६६ धावांचे आव्हान हैदराबादसाठी माफक वाटत होते. त्यामुळे या दमदार सलामीच्या जोरावर हैदराबादने हा सामना सहज जिंकला.