भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार…

Spread the love

नवीदिल्ली- भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स इतिहास रचण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्या म्हणजेच ७ मे रोजी त्या पुन्हा एकदा अंतराळात जाणार आहेत. सुनीता विल्यम्स बोईंगच्या स्टारलाइनर यानातून अंतराळात जातील. अंतराळवीर बुच विल्मोर हेदेखील त्यांच्यासोबत असतील. अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या म्हणण्यानुसार, हे यान भारतीय वेळेनुसार सकाळी 8:04 वाजता केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होईल.

बोईंग स्टारलाइनरमधून पहिल्यांदाच अंतराळवीरांना अंतराळात नेले जात आहे. यापूर्वी 2019 मध्ये Boe-OFT आणि 2022 मध्ये Boe-OFT2 लॉन्च करण्यात आले होते. विशेष म्हणजे, स्टारलाइनर मिशनसाठी एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला जात आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे एक आठवडा घालवतील.ही मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळ क्षेत्रातील हे मोठे पाऊल मानले जाईल.

59 वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी आतापर्यंत दोनवेळा अंतराळ प्रवास केला आहे. याआधी 2006 आणि 2012 मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. त्यांनी अंतराळात एकूण 322 दिवस घालवले आहेत. 2006 मध्ये 195 दिवस तर 2012 मध्ये 127 दिवस त्या अंतराळात होत्या. सुनीता विल्यम्स या अंतराळात प्रवास करणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत. त्यांच्या आधी कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या.

सुनीता विल्यम्स 1987 मध्ये यूएस नेव्हल अकादमीमधून पदवी घेतल्यानंतर नासामध्ये दाखल झाल्या होत्या. 1998 मध्ये त्यांची नासामध्ये अंतराळवीर म्हणून निवड झाली. त्यांचे वडील दीपक पांड्या 1958 मध्ये अहमदाबादहून अमेरिकेत स्थायिक झाले होते. सुनीताचा जन्म 1965 मध्ये झाला. यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतलेल्या सुनीता विल्यम्सनेही लढाऊ विमानेदेखील उडवली आहेत. त्यांना 30 प्रकारच्या लढाऊ विमानांवर तीन हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. सुनीता यांनी मायकेल विल्यम्स यांच्याशी लग्न केले असून मायकेल टेक्सासमध्ये पोलिस अधिकारी होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page