विशाखापट्टणम येथील ऑल इंडिया फेडरेशन कप कॅरम स्पर्धेत आकांक्षाने केली सुवर्ण कामगिरी
रत्नागिरी- आंध्रप्रदेश राज्य कॅरम असोसिएशन यांच्या विद्यमाने गितम केआरएम इंदोर स्टेडियम विशाखापट्टणम येथे झालेल्या ऑल इंडिया फेडरेशन कप कॅरम स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील संंगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा उदय कदम हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
आंध्र प्रदेश राज्य कॅरम असोसिएशन यांच्या विद्यमाने गितम केआरएम इंदोर स्टेडियम विशाखापट्टणम येथे २८ व्या ऑल इंडिया फेडरेशन कप कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम ही इंडियन ऑईल व ओएनजीसी कंपनीच्या संघातून सहभागी झाली होती. या स्पर्धेत आकांक्षाने उत्तुंग अशी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत २७ राज्य व १० कंपन्यांचे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत १८ वर्षीय आकांक्षाने चमकदार कामगिरी करत सर्वांची मने जिंकली आहेत. आकांक्षाने आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयेशा खान, एस अपूर्वा, रश्मीकुमारी यांना पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
आंतरराष्ट्रीय कॅरमपटू एस. अपूर्वा बरोबर खेळताना तिने ब्रेक टू फिनिशची नोंद केली. परंतु सेमीफायनलला आंतरराष्ट्रीय कॅरमपटू नागाज्योतीकडून आकांक्षाला थोडक्यात हार पत्करावी लागली. आकांक्षाने राज्य पातळीवर तीन वेळा ज्युनिअरचे तर आठवेळा खुल्या गटाचे विजेतेपदक पटकावले आहे. तर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत ज्युनिअर गटात आकांक्षाने एक वेळेस विजेतेपद तर एक ब्रांझ पदक मिळविले आहे. शालेय राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक व दोन ब्रांझ पदके मिळवली आहेत. जिल्हास्तरीय, विभागीय स्पर्धेतही आकांक्षाची कामगिरी लक्षणीय राहिली आहे. वयाच्या १७ व्या वर्षी आकांक्षाने पश्चिम बंगाल दुर्गापूर येथे झालेल्या इन्स्टिट्यूटच्या नॅशनल कॅरम स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून विजेतेपद पटकावले होते.