छत्रपती संभाजीनगर- पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीला जोड धंदा म्हणून तरूण शेतकऱ्याने थेट अत्याधुनिक एसी कुक्कुटपालनाचा प्रकल्प उभारला आहे.
कुक्कुटपालनामध्ये ३० हजार पक्षांचं पालन केलं आहे. व्यवसाय नवीन असल्याने वर्षभरात अनेक चढउतार आले. मात्र कुटुंबीयांची खंबीर साथ असल्याने न डगमगता मेहनत घेतली. वर्षभरानंतर व्यवसाय रुळावर आला असून आता हा तरूण महिन्याला तब्बल ३ लाख तर वर्षाला ३५ ते ४० लाख रुपये उत्पन्न कमावत आहे. सोबतच ३ जणांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे. या यशस्वी शेतकऱ्याची जिल्ह्यात चर्चा आहे. बॉयलर कुक्कुटपालन हा एसीमध्ये सुरू करायचा असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात भांडवल लागत होतं.दरम्यानच्या काळात अडचणी आल्या आणि त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने संदीपने कुक्कुटपालन स्वतःच्या शेतात उभा केला.लाखो रुपये खर्च करून उभारलेले व्यवसाय चालवण्याची जबाबदारी एकट्यावर आली, मात्र त्यातही त्यानं यश मिळवलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ या छोट्याश्या गावातील संदीप दिगंबर मतसागर असे यशस्वी शेतकऱ्याचं नाव आहे. संदीप यांचे आई वडील शेती करतात. संदीप याने गावातून प्राथमिक व माध्यमिक तर शहरातून बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं.संदीपला लहानपापासूनच नोकरी पेक्षा व्यवसाय आणि शेतीची आवड होती.बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावात कापड दुकान सुरू केलं.मात्र त्यात यश आले नाही. अपयशातून खचून न जाता पुन्हा व्यवसाय करायचं ठरवलं आणि त्यातून व्यवसायाची चाचपणी केली. यावेळी कुक्कुटपालन बद्दल नातेवाईक व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली. यामध्ये बारकाईने विचार करून बॉयलर कोबंड्यांच्या पालनाचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय संदीप यांनी घेतला.
संदीपला पहिल्या दिवशी कंपनीने ३० हजार पक्षी दिले.एवढे मोठ्या संख्येने पक्षी सांभाळणे म्हणजे मोठी जबाबदारी होती.पक्षाच्या संगोपनात थोडी जरी चूक झाली तर ३० हजार पक्षांच्या जीवाला धोका व कोट्यवधी रुपयांच नुकसान होऊ शकतं यांची जाणीव संदीप यांना होती.यामुळे पहिल्या दिवसांपासून रात्रीचा दिवस करून मेहनत घेतली. पहिली बॅच यशस्वीपणे काढली. मात्र, त्यात फारसं उत्पन्न मिळाले नाही. दुसरी बॅच सांभाळत असताना तांत्रिक अडचणीमुळे अनेक पक्षी दगावले.यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यानंतर दोन महिने आम्हाला व्यवसाय थांबवावा लागला.
बॅचमध्ये तांत्रिक अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र त्यातून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचं संदीपनं सांगितलं. कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे लक्षात आलं त्यानंतर आम्ही त्यांना बॅच घ्यायला सुरुवात चालू केली. आता वर्षभर आम्हाला व्यवसाय रुळावर आणायला वेळ मिळाला आता आमचा व्यवसाय पूर्णपणे रुळावर आला असून महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न तर वर्षाला ३५ ते ४० लाख रुपये उत्पन्न मिळते असं संदीप मतसागर सांगतात.