दुष्काळाच्या झळा ओळखून विद्यार्थ्यांचा जलसंधारणासाठी पुढाकार!…

Spread the love

नवनिर्माण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धामणीत श्रमदानातून बांधला बंधारा; ग्रामस्थांच्या सहकार्याने जलसाठ्याला बळ…

राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रामपंचायत धामणी यांचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक..

श्रीकृष्ण खातू / धामणी

संगमेश्वर, दि. २३ ऑक्टोबर २०२६ : यंदा पावसाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच विश्रांती घेतल्याने कोकणातही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कडक उन्हामुळे नाले आणि नद्यांची पाणीपातळी खालावत असताना आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन नवनिर्माण महाविद्यालय, लोवले येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी जलसंधारणासाठी पुढाकार घेतला. धामणी ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने धामणीतील पवारवाडी पुलासमोर असावी नदीवर श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला.

विद्यार्थ्यांचे श्रमदान; जलसंधारणाला हातभार…

शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी नवनिर्माण महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी धामणी येथे दाखल झाले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांसोबत खांद्याला खांदा लावून बंधारा बांधण्याचे काम पूर्णत्वास नेले. आगामी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अशा जलसंधारणाच्या कामांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे यंदा पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक बनले आहे. याच सामाजिक जाणिवेतून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत जलसंधारणाच्या कार्यात सहभाग नोंदविला.

लोवले गावातही यापूर्वी चार बंधाऱ्यांची उभारणी…

नवनिर्माण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी लोवले गावातही चार बंधारे बांधण्याचे काम केले आहे. धामणीतील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक कार्याची ही परंपरा पुढे सुरू राहिली आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता समाजासमोरील प्रत्यक्ष प्रश्न समजून घेणे आणि त्यावर सामूहिक प्रयत्नांतून उपाय शोधणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा पैलू ठरला.

*भविष्यातही जलसंधारणासाठी योगदान देण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प…*

विद्यार्थीदशेत दुष्काळ आणि पाणीटंचाईचे वास्तव अनुभवताना जलसंधारणाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने समजत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. भविष्यात कोणत्याही क्षेत्रात कार्यरत झालो, तरी पाण्याचा योग्य वापर, बंधाऱ्यांची उभारणी, आपत्ती व्यवस्थापन, दुष्काळ निवारण आणि पुनर्वसन अशा सामाजिक विषयांमध्ये योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राजकारण, समाजकारण किंवा प्रशासन अशा कोणत्याही क्षेत्रात गेल्यानंतरही पाण्याबाबत जनजागृती करण्याचे काम सुरू ठेवू, अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली.

विद्यार्थ्यांचा हा सेवाभावी उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पेंडसे आणि हॉटेल उद्योजक प्रभाकर घाणेकर यांनी व्यक्त केले. तरुण पिढीने विद्यार्थी अवस्थेपासूनच सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून प्रत्यक्ष कृतीतून योगदान देणे ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

*मान्यवरांची उपस्थिती…*

या बंधारा बांधकामाच्या वेळी नवनिर्माण महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रशांत जाधव आणि वर्षा झेपले, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पेंडसे, श्रद्धा हॉटेलचे मालक प्रभाकर घाणेकर, धामणी ग्रामपंचायतीचे प्रशासक व केंद्रप्रमुख एकनाथ चांदे, ग्रामपंचायत अधिकारी संदीप राख, ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार देवरुखकर आणि समीर कांबळे उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थ दिगंबर लिंगायत, नंदकिशोर मोहिरे, सुरेश पवार, रमेश पवार, माजी सैनिक सदाशिव पवार, सागर पवार, दीपक पवार यांच्यासह अन्य ग्रामस्थांनीही सहभाग नोंदविला.

पाण्याचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांनी श्रमदानातून उभारलेला हा बंधारा म्हणजे केवळ जलसंधारणाचा प्रयत्न नसून सामाजिक जबाबदारीची जाणीव रुजवणारा उपक्रम ठरला आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page