
प्रतिनिधी :- विनोद चव्हाण-
संगमेश्वर तालुक्यातील साडवली गावातील मनिषा अंकुश वगरे यांची प्रजासत्ताक दिन २०२५ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या भव्य परेडसाठी विशेष अतिथी म्हणून निवड झाली आहे. या सन्मानामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.
देशभरातील कृषिसखी, उद्योगसखी, व महिला स्वयंसहाय्यता समूह सदस्यांपैकी निवडक सदस्यांना कर्तव्यपथावर होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आमंत्रित केले जाते. यावर्षी मनिषा वगरे यांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा मान मिळवला आहे.
मनिषा वगरे यांनी सांगितले की, “आमच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असतानाही उमेदच्या माध्यमातून मला कामाची संधी मिळाली. मी या संधीचे सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची पोचपावती आज मिळाली आहे. माझ्या कुटुंबाचा, सहकाऱ्यांचा, आणि उमेदच्या टीमचा मला या प्रवासात मोठा आधार मिळाला.”
गावकऱ्यांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “साडवली गावाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे गावकऱ्यांनी व्यक्त केले.मनिषा वगरे यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.