पुणे/26 मार्च- शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रूपाली चाकणकर, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटीलदेखील उपस्थित होते. शिवाजीरावांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत आता बघायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याव्यतिरिक्त सर्व खासदार शरद पवारांबरोबर राहिले होते. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटात जाण्यास नकार दिला. त्यामुळे अजित पवार गटाला या मतदारसंघात एका तगड्या उमेदवाराची आवश्यकता होती. तर दुसऱ्या बाजूला शिरूर लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळणार असल्याने शिवाजीराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचं बोलले जात आहे.