मनोज जरांगे यांचे सहकारी अजय महाराज बारसकर यांच्यानंतर आता जरांगेंच्या आणखी एका सहकाऱ्यानं गंभीर आरोप केले आहेत. यामुळं मराठा आंदोलनात फूट पडली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे – मराठा आरक्षणाबाबत सरकारनं विधिमंडळाचं अधिवेशन घेत आरक्षण दिलं असून सरकारनं आम्हाला दिलेलं आरक्षण मान्य नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतलीय. असं असताना मनोज जरांगे यांच्या आंदोलनात आता मोठी फूट पडली असून, जरांगे यांचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर आता जरांगे यांच्या सहकारी असलेल्या संगीता वानखेडे यांनी देखील जरांगेंवर गंभीर आरोप करत त्यांच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार असल्याचं सांगितलंय.
मनोज जरांगेंना मीडियाची सवय-
मनोज जरांगेंवर टीका करताना संगीता वानखेडे म्हणाल्या की, “मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेडं बनवलंय. मनोज जरांगे कोण हे मीडियाला सुद्धा माहिती नव्हतं. पण आता त्यांना मीडियाची सवय लागलीय. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोलही केलं होतं, तेव्हा ते लोक मला गलिच्छ भाषेत बोलत होते. पण स्वतःसाठी ते आंदोलन करत असून आता सरकारनं आरक्षण दिलेलं असतानाही त्यांनी आंदोलनाची घोषणा केलीय. ज्यासाठी लढा उभा केला होता, ती मागणी पूर्ण झालीय. असं असताना मीडिया जिवी झालेला हा माणूस आता आंदोलन करत आहेत.”
शरद पवारांचं आर्थिक पाठबळ-
पुढं बोलताना संगिता वानखेडे म्हणाल्या, “मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरु केलंय, त्यामागे शरद पवार असून आंदोलनासाठी सर्व आर्थिक पाठबळ पवारांनी दिलंय.” तसंच सभेलाही शरद पवार यांचेच कार्यकर्ते असल्याचं गंभीर आरोप यावेळी वानखेडे यांनी केलाय. यामुळं आता मराठा आंदोलनात मोठी फूट पडल्याचं दिसून येतंय.