जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | फेब्रुवारी ०७, २०२३.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलं आहे. तर, आमच्याकडे बाळासाहेब थोरात यांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये म्हटलं आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठं राजकारण रंगलं आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत थोरात यांची निष्क्रियता तसंच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घवडून आणण्यात अपयश आल्यामुळे थोरात यांचं विधिमंडळ पक्षनेतेपद अडचणीत होतं. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीनंतर त्यांच्याकडे पक्षनेतेपद ठेवयाचं का यावर निर्णय होणार होता. पण त्यापूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आपलं नाराजीचं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलं होतं. पक्षात आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला. थोरात यांनी ज्या दिवशी नाराजीचं पत्र लिहिलं त्याच दिवशी बाळसाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी हा राजीनामा थेट काँग्रेस हायकमांडकडे दिला असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे या प्रकरणी आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस हायकमांड थोरतांची मनधरणी करणार की नाशिक पदवीधर मतदारसंघातील घोळाला जबाबदार ठरवून त्यांना पदावरून हटवून कठोर भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे. त्यापूर्वी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या पदाच्या राजीनाम्याची चर्चा असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलतच नाही. कारण त्यांची प्रकृती चांगली नाही. पण त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, असं पटोले म्हणाले. बाळासाहेबांचा राजीनामा आमच्याकडे आलेला नाही, असं नाना पटोले म्हणााले. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एबी फॉर्मवरून अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केलं होतं. तर निवडणुकीत थोरात यांची भूमिका काँग्रेसला अनुकूल नव्हती. निवडणुकीत निष्क्रिय राहून त्यांनी तांबे यांना मदत केली, असा आरोप काँग्रेसमधील एका गटाने केला आहे.