सर्फराज खानच्या भावाची अष्टपैलू कामगिरी; भारतीय यंग ब्रिगेडनं न्युझीलंडचा धुव्वा उडवत मिळवला सलग चौथा विजय…

Spread the love

19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा ब्रिगेडचा विजयरथ सुरुच आहे. मंगळवारी झालेल्या सुपर 6 च्या सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडचा 214 धावांनी धुव्वा उडवला.

*ब्लोमफॉन्टेन (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेत पार पडत असलेल्या 19 वर्षाखालील विश्व चषकात भारतीय संघाची धमाकेदार कामगिरी सुरुच आहे. मंगळवारी मुशीर खानचं (१३१ धावा) दमदार शतक आणि त्यानंतर सौम्या पांडेच्या (४ विकेट्स) घातक गोलंदाजीमुळं भारतीय संघानं न्यूझीलंडचा 214 धावांच्या मोठ्या फरकानं धुव्वा उडवला. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे. या स्पर्धेत भारत पुन्हा एकदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचं दिसतंय. तर न्यूझीलंडचा हा तिसरा मोठा पराभव आणि धावांच्या बाबतीत तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरलीय.



न्युझीलंडचा डाव 81 धावांत संपुष्टात ….

प्रथम फलंदाजी करताना मुशीरच्या 131 धावा आणि सलामीवीर आदर्श सिंगच्या 52 धावांच्या खेळीमुळं भारतीय संघानं आठ गडी गमावून 295 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव डावखुरा फिरकीपटू पांडे (19 धावांत 4 बळी) आणि मुशीर (10 धावांत 2 बळी) तसंच वेगवान गोलंदाज राज लिंबानी (17 धावांत 2 बळी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर 28.1 षटकांत केवळ 81 धावांत संपुष्टात आला.

4 बाद 22 अशी केविलवाणी अवस्था….

वेगवान गोलंदाज लिंबानीनं धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडला डावाच्या पहिल्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे टॉम जोन्स (00) आणि स्नेहित रेड्डी (00) यांना बाद करत दोन धक्के दिले. त्यानंतर पांडेनं लचलान स्टॅकपोल (05) आणि जेम्स नेल्सन (10) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आणि न्यूझीलंडची अवस्था 4 बाद 22 अशी केविलवाणी झाली. या धक्क्यातून संघ कधीच सावरला नाही. त्यांच्याकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सननं सर्वाधित 19 धावा केल्या.

मुशीरचं दुसरं शतक….

मेंगोंग ओव्हलच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर, प्रथम फलंदाजी करताना भारताच्या मुशीरनं न्यूझीलंडचं गोलंदाजी आक्रमण उद्ध्वस्त केलं आणि चालू स्पर्धेत 300 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला. मुशीरनं 126 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 131 धावांची खेळी केली. मुशीरनं मैदानात चौफेर फटके मारले. शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यातही तो यशस्वी ठरला. मात्र, भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या अर्शीन कुलकर्णीची (09) विकेट संघानं झटपट गमावली. यानंतर मुशीर आणि आदर्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करत डाव सावरला. आदर्श सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र, 18 व्या षटकात जॅक कमिंगच्या (37 धावांत 1 बळी) चेंडूवर तो झेलबाद झाला.

शेवटच्या षटकांमध्ये ठराविक अंतरानं विकेट…

यानंतर मैदानावर आलेला भारतीय कर्णधार उदय सहारन (57 चेंडूत 35 धावा, 2 चौकार) चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला. या सामन्यापूर्वी त्यानं सलग तीन अर्धशतकं झळकावली होती. सहारननं मुशीरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. भारतानं शेवटच्या षटकांमध्ये ठराविक अंतरानं विकेट गमावल्या त्यामुळं संघाला 300 धावांचा टप्पा पार करता आला नाही. आपलं शतक पूर्ण केल्यानंतर 48 व्या षटकात मुशीर मेसन क्लार्कचा बळी ठरला. न्युझीलंडकडून क्लार्कनं 64 धावांत 4 बळी घेतले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page