श्रीकृष्ण खातू / धामणी- सध्याच्या प्रगत होत चाललेल्या काळात धाडसाने आपण वैयक्तिक प्रगती करावी व त्यासाठी परिश्रमाने झेप घ्यावी अशी जिद्द व खुणगाट मनाशी बांधून महिलांसाठी अवघड असलेल्या क्षेत्रात (ट्रेन ऑपरेटर) मेट्रो चालक पदावर नुकतीच रुजू झालेली संगमेश्वर तालुक्यातील माभळे घडशीवाडीतील कन्या राखी संदीप घडशी हिने एक धाडसी व जिद्दी महिला तसेच मेट्रो चालक म्हणून नावलौकिक मिळवला आहे.व याचा सार्थ अभिमान या परिसरातील प्रत्येकास नक्कीच आहे.
दिवाळीनिमित्त नुकतीच राखी आपल्या माभळे गावी आल्याने संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीने तिचा खास सन्मान पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
पैसा फंड संगमेश्वर येथे बारावी पर्यंत शिक्षण घेऊन सावर्डे येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा दोन वर्षाचा कोर्स करून ऑनलाइन भरतीसाठी एप्लीकेशन केल्याने त्यामधून ही निवड झाली. त्यानंतर तीन महिन्याचे खास प्रशिक्षण होऊन मेट्रो चालक पदावर रुजू झाली. ही बाब येथील महिलांसाठी व कुटुंबासाठी नक्कीच भूषणवह असल्याचे सांगून तिच्या पुढील वाटचालीस पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे ,पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे ,तसेच पोलीस अंमलदार, बंधू भगिनी इत्यादींनी तिला शुभेच्छा दिल्या. व अशीच प्रेरणा इतर महिलांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
पोलीस स्टेशनच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संगमेश्वर परिसरातील अनेकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमातून महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल व निर्भिडपणे पुढे जातील, असे म्हटले आहे.
याप्रसंगी राखीला ज्या ज्या मंडळींचे यासाठी सहकार्य मिळाले ,त्यांचा नामोल्लेख तिने न विसरता केला. व त्यांना धन्यवाद। दिले. या वेळी राखीचे वडील संदीप घडशी,चुलते प्रकाश घडशी, आजोबा विनायक घडशी,कृष्णा घडशी,व पोलीस स्टेशनचा स्टाफ इत्यादी उपस्थित होते.