रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : टपाली मतपत्रिका प्राप्त करुन घेण्यासाठी उद्या रविवार 14 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत नमुना 12 भरुन द्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी केले.
यासंदर्भात सर्व समन्वयक अधिकारी, नोडल अधिकारी यांची आज जुन्या इमारतीमधील सभागृहात बैठक झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विशेष भूसंपादन अधिकारी निशा कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, अपर कोषागार अधिकारी प्र. शं. बिरादार, उपवन संरक्षक गिरिजा देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड म्हणाले, मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक प्रक्रीयेतील सेवा बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दिली आहे. नमुना 12 सोबत निवडणूक प्रक्रियेत बजावण्यात आलेल्या सेवेचा आदेशाची झेराॕक्स प्रत, मतदार ओळखपत्राची झेरॉक्स जोडून उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जुनी जिल्हाधिकारी इमारत, दुसरा मजला येथे सादर करावेत. यानंतर नमुना 12 कसा भरावयाचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन, त्यांनी टपाली मतदान प्रक्रीयेची सविस्तर माहिती दिली.